नेत्रदान सृष्टीच्या चमत्कारिक स्वरूपाचे दर्शन घडविते : डॉ.एस.एम.लोया
सेलूतील नूतन महाविद्यालयात अवयवदान जनजागृतीपर व्याख्यान
सेलू : आजच्या धकाधकीच्या परिस्थितीत अवयवदान, रक्तदान व नेत्रदान सर्वात मोठे दान आहे. अवयवदानाद्वारे माणूस मरणोत्तर इतरांच्या जगण्याचा आधार बनतो. त्यांच्या जगण्यातील आनंद होतो. नेत्रदानामुळे आपण मरणोत्तर नेत्ररुपाने नयनरम्य सृष्टीचा अविष्कार म्हणून जिवंत राहतो. तसेच नेत्रदान सृष्टीच्या चमत्कारिक स्वरूपाचे दर्शन घडविते असते, असे प्रतिपादन याप्रसंगी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ तथा नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांनी केले.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी, २५ फेब्रुवारी रोजी नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व बीसीए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व अवयवदान, मरणोत्तर नेत्रदान जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ.लोया बोलत होते. नेत्रदानाबरोबरच त्यांनी रक्तदान व अवयवदानाचे महत्त्वदेखील महत्त्व पटवून सांगितले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरेश उगले, डॉ.कीर्ती निराळवाड, बीसीए विभाग प्रमुख प्रा.देविदास ढेकळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.सुरेश उगले यांनी केले.आभार डॉ.कीर्ती निराळवाड यांनी मानले.