महाशिवरात्री : सेलूतील श्री साईबाबा मंदिरात महाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी
३०१ जोडप्यांच्या हस्ते श्री महेश्वर शिवलिंगाचा अभिषेक, सायंकाळी रंगणार ‘स्वरभक्ती संध्या’
सेलू : महाशिवरात्रीनिमित्त शहरातील महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील जलाने शहरातील ३०१ जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महाआरती बुधवारी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे. अभिषेकासाठी लागणारे साहित्य मंदिरातर्फे देण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता स्वरांगण प्रस्तुत ‘स्वरभक्ती संध्या’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवलिंगाचा अभिषेक करून पुण्यार्जन करावे, भक्तिगीतांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर समिती तसेच संयोजकांनी केले आहे.