‘बम बम भोले’च्या गजराने शिवालये दुमदुमली
परभणी : महाशिवरात्रीनिमित्त परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणची शिवालये हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने शिवालये दुमदुमून गेली. दर्शनाकरीता शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली. सर्वच शिव मंदिरांमधून बुधवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत पूजा, अर्चेसह अन्य भरगच्च धार्मिक कार्यक्रम तसेच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला.
प्रसिध्द श्री पारदेश्वर मंदिर, नांदखेडा रस्त्यावरील श्री बेलेश्वर महादेव मंदिरातसुध्दा दर्शनाकरीता भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील श्रीक्षेत्र धारासूर या ठिकाणी गुप्तेश्वर मंदिरात बुधवारी पहाटेपासून महाकुंभ अमृतस्नान सोहळ्यास हजारो ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यामुळे गोदावरीचा संपूर्ण घाट भावीकांच्या गर्दीने अक्षरशः फुललेला होता. मुदगल येथील श्री मुदगलेश्वराच्या मंदिरातही दर्शनाकरीता भाविकांची गर्दी उसळली. रत्नेश्वर रामपुरीत, तसेच श्रीक्षेत्र गुंज येथील महादेव मंदिर, सेलू तालुक्यातील हातनूर येथील नागनाथ महादेव, निरवाडी, वालूर येथील श्री वाल्मिकेश्वर, सेलू येथील श्री शंकरलिंग मंदिरासह विविध वसाहतीतील महादेव मंदिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फोटो – उत्तम बोरसुरीकर