धारासूरमध्ये महाकुंभ अमृतस्नानास भाविकांची अलोट गर्दी

धारासूरमध्ये महाकुंभ अमृतस्नानास भाविकांची अलोट गर्दी

महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील प्रसिद्ध असलेले धारासूर येथे महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी (दि.26) पहाटेपासून महाकुंभ अमृतस्नान सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या सोहळ्यास आचार्य मनिषानंद पुरी महाराज व हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांची विशेष उपस्थिती होती.श्री गुप्तेश्‍वराच्या दर्शनाकरीता भाविकांची मोठी गर्दी उसळली. त्यामुळे मंदिर परिसरासह गोदावरी घाट हजारोंच्या संख्येने भक्तजनांच्या गर्दीने फुलून गेला होता.

महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने पा समस्त गावकरी मंडळी,भजनी मंडळी व जय मल्हार मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीराम कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यास 20 फेबु्रवारी रोजी प्रारंभ झाला. रामायणाचार्य हभप नामदेवजी महाराज लबडे पंढरपुरकर हे रामकथेचे प्रवक्ते असून साथ संगत अनिरुध्द बापू नालेगांवकर व माऊली महाराज धारासूरकर हे करत आहेत.या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दररोज काकडा आरती, विष्णूसहस्त्रनाम, ज्ञानेश्‍वरी पारायण, गाथा भजन,श्रीराम कथा, रात्री पुजा आरती, कीर्तन व हरिजागराचा कार्यक्रम होतो आहे.

ज्ञानेश्‍वरी पारायणाचे नानासाहेब जाधव, त्रिंबक जाधव, हनुमानराव क्षीरसागर हे नेतृत्व करीत आहेत. आज महाशिवरात्रीच्या अमृतपर्व महाकुंभ स्नानाच्या दिवशी या सप्ताहात गुरुवर्य 1008 आचार्य मनिषानंद पुरी महाराज व हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांची विशेष उपस्थिती होती.

दरम्यान, महाशिवरात्री निमित्त ग्रामस्थांच्या वतीने गावात बुधवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यात संत-महंतांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत ग्रामथस्थांनी स्वागत केले. गोदावरी घाटावर अमृतस्नानाकरीता हजारोच्या संख्येने पुरुष व महिला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.येथील प्राचीन चालुक्यकालीन असलेल्या श्री गुप्तेश्‍वर महादेव मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम पुरातत्त्व विभाग अंतर्गत सवानी कन्स्ट्रक्शन, मुंबई तर्फे करण्यात येत आहे.श्री गुप्तेश्‍वराच्या दर्शनाकरीता भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.पहाटेपासून अभिषेक तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!