हेलसच्या महादेव मंदिरात विविध कार्यक्रम
दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची रीघ
मंठा : हेलस येथील प्राचीन हेमाडपंथी हरहर महादेव मंदिरात वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी महाभिषेक झाला. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी ‘हर हर महादेव’ च्या जयघोष गर्दी केली होती.
सकाळी साडे अकरा वाजता रखमाजी महाराज देवगावकर यांचे कीर्तन झाले. संत नरहरी सोनार महाराज यांचा ” भस्म उटी रुंडमाळा, हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा” हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता.
प्रभु शिवशंकरांच्या शक्ती व भक्तीचे महत्त्व विशद केले. रखमाजी महाराज म्हणाले की, भगवंताच्या भक्तीसोबत ज्ञान असणे आवश्यक आहे. सत्ता, प्रतिष्ठा आणि पैसा असतांना विनम्रतेने ऐश्वर्याला शोभा येत असते. भगवंत चिंतनात सर्व सुखाचें आगर आहे. मृदंगाचार्य कृष्णा महाराज खराबे, त्रिंबक महाराज खराबे, राम महाराज खराबे, बालासाहेब महाराज आर्डा, दत्ताआप्पा खराबे, दत्ता पाटील आणि संस्थेतील विद्यार्थ्यांनी साथसंगत केली. हर हर महादेव वारकरी शिक्षण संस्थेचे हेलस संचालक आप्पा महाराज भुसारे साहेबराव गुरूजी, शंकरराव हेलसकर, विश्वनाथ संत, तुळशीराम महाराज खराबे, सुभाषराव खराबे आदींसह भाविकांची उपस्थिती होती. महाप्रसादाने सांगता झाली.