बीएड आता राष्ट्रीय पातळीवर
‘एनटीए’ राबविणार आयटीईपीसाठी प्रवेश परीक्षा
मुंबई : राष्ट्रीय अध्यापक शक्षक परिषदेच्या म्हणजेच ‘एनसीटीई’ च्या सुचनेनुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षीय बीए/बीएससी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या अभ्यासक्रमाऐवजी चार वर्षांचा एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम म्हणजेच ‘इंटिग्रेटेड टिचर्स एज्युकेशन प्रोग्रॅम’ (आयटीईपी) हा अभ्यासक्रम राबवला जाईल. त्यासाठीची प्रवेश परीक्षा ‘एनटीए’ द्वारे राबवली जाणार आहे.
बीए/बीएससी या विषयांमध्ये बीएड करण्यासाठीचा चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राबवला जात होता. दरवर्षी या परीक्षेच्या ‘सीईटी’ साठी अडीच ते तीन हजार उमेदवार अर्ज भरत होते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया ‘सीईटी’ कक्षाद्वारे राबवली जात होती. हा अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून बंद करून त्याचे रुपांतर चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय ‘एनसीटीई’ ने घेतला. या निर्णयाबाबत राज्यातही चर्चा झाली असून, त्याला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता देत हा बदल स्वीकारला आहे. त्यामुळे या अडीच हजार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सीईटी’ द्यावी
लागणार आहे.
आता काय होणार ?
‘एनसीटीई’ने या संदर्भातील माहिती फेब्रुवारी महिन्यातच सर्व महाविद्यालयांना कळवली होती. या महाविद्यालयांना ‘आयटीईपी’ अभ्यासक्रम राबवण्यासाठी परिषदेकडे अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बीए/बीएससी एकात्मिक बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी सीईटी कक्षाने डिसेंबर २०२४ मध्येच अर्जनोंदणी सुरू केली होती. तसेच या परीक्षेची तारीखही जाहीर करण्यात आली होती.
मात्र, आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पत्रानुसार सीईटी कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४ वर्षांच्या बी.ए./बी.एससी-बी.एड (एकात्मिक) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनटीए’ मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एनसीईटी २०२५’ साठी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. हा अभ्यासक्रम ‘एनसीटीई’ कडे गेल्याने त्याची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (एनसीईटी) राबवली जाणार आहे. ही परीक्षा ‘एनटीए’द्वारे २९ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी सुरू झाली असून, १६ मार्च ही अंतिम तारीख आहे. www.nta.ac.in या आणि https: //exams. nta. ac.in/NCET/ या दोन संकेतस्थळांवर जाऊन उमेदवारांना अर्ज नोंदवता येईल.
शुल्क परत मिळणार
याआधी ‘सीईटी’ कक्षाकडून होणाऱ्या चार वर्षांच्या बीए/बीएससी बीएड या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनेक विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आता ही परीक्षा रद्द झाल्याने या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना भरलेले शुल्क परत मिळणार आहे. अर्ज भरताना ज्या बैंक खात्यातून शुल्क भरले होते, त्याच बँक खात्यात हे शुल्क परत करण्यात येईल. याबाबतची सूचना राज्य सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर होणार आहे.
cerdit -Mata/ Photo -AI