थकबाकीमुळे सेलूचा पाणीपुरवठा तोडला
निम्न दुधना प्रकल्पाची कारवाई, पंपहाऊसला कुलूप; सेलूकरांना निर्जळी
सेलू जि.परभणी : सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत १ कोटी २ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या वसुलीसाठी सोमवारी दुपारी १२ वाजता सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला कुलूपे ठोकून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. उर्वरित रक्कम अदा करेपर्यंत कुलूप काढण्यात येणार नसल्याची माहिती कनिष्ठ अभियंता बी.डी. मार्गे यांनी मंगळवारी दिली.
निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत पाणीपट्टीमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी १ कोटी ४४ लाख ६११ रुपये, तर स्थानिक उपकर २ लाख ४६ हजार ८९० रुपये असे एकूण १ कोटी २ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या वसुलीची नोटीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पोळ यांना ५ मार्च २०२५ रोजी देण्यात आली होती. यापैकी एकूण रकमेपैकी १० लाख रुपये, अर्थात १० टक्के रक्कमेचा भरणा, सेलू नगरपालिकेकडून ८ मार्च रोजी करण्यात आला होता. उर्वरित रकमेसाठी १० मार्च रोजी प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला टाळे ठोकून सेलूचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता एस.बी.कोरके यांच्या आदेशावरून उपअभियंता एच.एस.धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता बी.डी.मार्गे यांनी ही कार्यवाही केली आहे. यावेळी एस.यु.शेख, ए.टी. कोल्हे, एस.एस.पठाण, कृष्णा देऊळगावकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, या कारवाईमुळे सेलूकरांना निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे.