कृषी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद
परभणीमध्ये जमली हजारोंची मांदियाळी
परमणी : श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) च्या वतीने ७ मार्चपासून परभणीतील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मैदानावर आयोजित चार दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. चारही दिवस विविध कार्यक्रमांसाठी कृषी महोत्सवात हजारोंची मांदियाळी जमली होती.
कृषी महोत्सवा अंतर्गत चर्चासत्र, मेळावे व विविध प्रदर्शनीसह शेकडो स्टॉल्सवर दररोज हजारो नागरीकांनी भेटी देवून मोठा प्रतिसाद दिला. नामांकित कंपन्यांचे खत, औषधे, आधुनिक यंत्र सामुग्री, सेंद्रीय व जैविक तंत्रज्ञान, शेती उपयोगी विविध अवजारे, केळी, कपाशी, टिशू कल्चर बि-बियाणे, पशू खाद्य, अपारंपारिक उर्जा, प्रक्रिया उद्योग, पॉली हाऊस, कृषि विमा, बँक, कृषि पर्यटन व कृषि संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग लक्षवेधी ठरला.
मराठवाडा कृषी संस्कृती दर्शन, खाद्य संस्कृती, सण-उत्सव मांडणी, पूर्वीची समृध्द पर्यावरण पूरक गावे, त्यातील विज्ञान, पशूधन व गोवंश प्रदर्शन, त्यातून पशू आणि गोवंशातील प्रजातींसह गोठ्यांचे प्रात्यक्षिकांसह माहिती, पशूखाद्य, चार्याचे विविध प्रकार, डेअर उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान, दुग्ध व्यवस्थापनाबाबत माहिती व प्रात्यक्षिके, दूर्मिळ वन औषधी व रान भाज्यांचे प्रदर्शन, आयूर्वेदिक शेती, बाजारपेठ याची माहिती, दुर्मिळ वन औषधींची मांडणी, उपयोग याबाबत प्रबोधन केले गेले. तसेच मोफत आरोग्य व व्यसनमुक्ती शिबीर, शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला.
शहरासह जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरचेही हजारो नागरिक, कृषि व इतर क्षेत्रातील रोजगार या संदर्भात माहिती, प्रशिक्षणास आवर्जून उपस्थित होते. कृषि दिंडी सोहळ्याने महोत्सवास सुरुवात झाली होती. विषमुक्त शेती सत्र, पशू गोवंश सत्र, युवा कृषि नवचैतन्य अभियान, शेतकरी वधू-वर परिचय मेळावा, पर्यावरण प्रकृती जनजागृती अभियान, स्वयंरोजगार चर्चासत्र व महिला बचतगट मेळावा, माहिती तंत्रज्ञान जनजागृती अभियान सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी आदींसह विविध कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला. प.पू.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या अमृततुल्य हितगुजाने समारोप झाला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.