निम्न दुधना-सेलू पालिकेत “पाणीबाणी”; चार दिवसांपासून सेलूकरांना निर्जळी
थकीत पाणीपट्टीवरील ९३ लाखांचा दंड न भरल्याचा परिणाम
पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल : स्थानिक कर व निव्वळ पाणीकर थकबाकीपोटी ९ लाख २३ हजार ८९० रुपये रक्कमेचा भरणा सेलू नगरपालिकेकडून ७ मार्च रोजी करण्यात आला. मीटर रिडिंगप्रमाणे पाणीकर निरंक आहे. थकबाकीतील ९३ लाख ६७ हजार २४६ रूपयाची रक्कम दंड व विलंब शुल्क आहे. ते माफ व्हावे, यासाठीची कार्यवाही सुरू आहे यातून मध्यममार्ग निघून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, अशी माहिती मुख्याधिकारी युवराज पोळ यांनी बुधवारी दिली.
सेलू/परभणी : थकीत पाणीपट्टीची १ कोटी २ लाख ९१ हजार ५०० रुपयांची रक्क्म वसुलीसाठी सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसला १० मार्च रोजी निम्न दुधना प्रकल्प प्रशासनाने कुलूप ठोकले. यामुळे धुलीवंदनाच्या तोंडावर गेल्या तीन दिवसांपासून सेलूकरांना निर्जळीला तोंड द्यावे लागत आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या थकीत पाणीपट्टीमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी १ कोटी ४४ हजार ६११ रुपये, तर स्थानिक उपकर २ लाख ४६ हजार ८९० रुपये असे एकूण १ कोटी २ लाख ९१ हजार ५०० रुपयांच्या वसुलीची नोटीस पालिका मुख्याधिकारी यांना ५ मार्च रोजी देण्यात आली होती. परंतु, थकीत पाणीपट्टी वेळेत भरणा झाली नसल्याने सोमवारी, १० मार्च रोजी प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या पंप हाऊसला कुलूप ठोकून सेलूचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. कार्यकारी अभियंता एस.बी.कोरके यांच्या आदेशावरून उपअभियंता एच.एस.धुळगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता बी.डी.मार्गे यांनी ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, उर्वरित रक्कम अदा करेपर्यंत कुलूप काढण्यात येणार नसल्याची माहिती श्री.मार्गे यांनी बुधवारी, १२ मार्च रोजी दिली.