
जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पाथरीत राडा
परस्पर विरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा
पाथरी : पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी, १२ मार्च रोजी साईबाबा विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील वादाचे पडसाद सभागृहाबाहेर येताच पडले आणि दोन गटांत मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात आलोक चौधरी यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चौघांवर तर बाबाजानी यांच्या गटाच्या वतीने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून आलोक चौधरी यांच्यासह चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेमुळे दिवसभर पाथरीत तणावपूर्ण वातावरण होते. याबाबत अधिक माहिती अशी, पाथरी नगर परिषद सभागृहात साईबाबा विकास आराखडा संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक दुपारी एक वाजता पार पडली. या बैठकीत आलोक चौधरी यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स व घरकुल घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा का उपस्थित केला म्हणून माजी आमदार दुर्राणी व इतर तिघांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आलोक नारायण चौधरी यांना थापड बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार चौधरी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात दिली.
या प्रकरणी आमदार दुर्राणी यांच्यासह चौघा जणांवर पाथरी पोलीस ठाण्यात थापड बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तबरेज खान रहमान खान दुर्राणी, सहजाद खान, बक्तियार खान, हमीद खान शेरखान खान (रा.पोहेटाकळी) यांचा समावेश आहे. तक्रारीत माजी आ.अब्दुल्ला खान दुर्राणी यांचे ऐकून मला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राडा झाल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती. त्यामुळे शहरांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जादा पोलीस कुमकही मागवण्यात आली. दरम्यान, बाबाजानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमा झाले. याप्रकरणी आधीच्या गुन्ह्यातील फिर्यादीविरोधात तक्रार देण्यात आली. बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाच्या वतीने पठाण हमीद खान शेरखान यांनी दिलेल्या तक्रारीवरून आसेफ खान शेरगुल खान, सातखान आसेफ खान, युनूस कुरेशी, आलोक चौधरी यांच्या विरोधात मारहाणीचाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.