‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने सेलू दुमदुमले
संगीत तुलसी रामकथेनिमित्त शोभायात्रा मिरवणूक उत्साहात; कथेला सुरुवात
सेलू/परभणी : रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अमृतमय रसाळ वाणीतून मंगळवारी (२५ मार्च) सायंकाळी सेलू (जि.परभणी) येथे संगीत तुलसी रामकथेला उत्साहात सुरूवात झाली. यानिमित्त सायंकाळी पाच वाजता सेलू शहराचे ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज मंदीरपासून भव्य शोभायात्रा मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. ‘जय श्रीराम आणि ज्ञानोबा- तुकाराम ‘ जयघोषाने अवघी सेलूनगरी दुमदुमून गेली.
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व गुरूवर्य श्रीसंत नथुरामबाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध उद्योजक तथा आरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसादजी घोडके परिवारातर्फे २५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत हा कथा सोहळा आयोजिण्यात आला आहे. नूतन विद्यालय (हनुमान गढी) परिसरात सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत कथा होत आहे. शोभायात्रा मिरवणुकीत रथामध्ये रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक विराजमान होते. बँड पथक, कलश व तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगीत साधना आश्रम, संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि ताडबोरगाव येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांंनी घातलेल्या पाऊलींने लक्ष वेधले. कथा सोहळ्यात रविवारी, ३० मार्चरोजी वारकरी गौरव, संतपूजन आहे. दुपारी एक ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद आहे. कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक रामप्रसाद घोडके, भगवान घोडके, इंजि.अशोक घोडके, इंजि.अंबादास घोडके, डॉ.रविंद्र घोडके, राजेंद्र घोडके, देवराव काळे, डॉ.केदार खटींग, डॉ.कैलास आवटे, डॉ.शंकरराव काळे आदींनी केले आहे.