रविवारपासून सेलूमध्ये ‘श्रीसाई महोत्सव’

रविवारपासून सेलूमध्ये ‘श्रीसाई महोत्सव’

श्रीरामजन्मानिमित्त श्री साईबाबा मंदिरात आयोजन : श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, सुंदर माझी गुढी स्पर्धा आदी विविध कार्यक्रम

सेलू /परभणी : गुढीपाडवा व प्रभु श्रीरामजन्माच्या पावन पर्वावर सेलू येथील महेशनगरमधील साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत भव्य श्री साई महोत्सवाचे‌ आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत भागवताचार्य प्रा.संजय पिंपळगावकर महाराज श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. केदार तांबट, सदाशिव जाधव, मारोती महाराज भिसे, अर्जुन कसाब संगीत साथ देणार आहेत.

भागवत कथेदरम्यान, ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्रीकृष्ण रुख्मिनी विवाह सोहळ्याप्रसंगी आकांक्षा‌ आणि अमोल यांचा शुभ विवाह सोहळा होणार आहे. ३० मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता महिलांसाठी ‘सुंदर माझी गुढी’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

दररोज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या नामवंत कीर्तन कीर्तनकारांचे कीर्तन आहे. ३१ मार्च रोजी विनोदाचार्य दिगंबर महाराज नखाते, १ एप्रिलला आदीनाथ महाराज लाड (आळंदी), २ एप्रिलला शिवलीलाताई पाटील, ३ एप्रिलला भागवताचार्य रुपालीताई सवणे, ४ एप्रिल रोजी भारूडरत्न कृष्णा महाराज जोगदंड, ५ एप्रिलरोजी शिवचरित्रकार माऊली महाराज कोठुळे (मुबंई) यांचे कीर्तन होणार आहेत. ६ एप्रिल रोजी शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन आहे.

माऊली महाराज चव्हाण, सोपान महाराज चव्हाण, कृष्णा महाराज जाधव, नारायण महाराज पावले, झोडगावकर व सूरजनगर भजनी मंडळ साथसंगत करणार आहेत. दुपारी १२ वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव, महाप्रसाद (नगरभोजन) तर सायंकाळी ७ सामुदायिक महाआरतीने सांगता होणार आहे. भाविकांनी विविध कार्यक्रम तसेच कथा श्रवणाचा, दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवासाठी महेशनगरातील नागरिक, महिला मंडळ आदींसह स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!