श्रीनागनाथांवर सूर्यनारायणांचा अभिषेक सुरू

श्रीनागनाथांवर सूर्यनारायणांचा अभिषेक सुरू

हातनूर येथील शिवमंदिराच्या स्थापत्यकलेमुळे भाविक अनुभवतात अद्भुत सोहळा : बालासाहेब शेळके

सेलू/परभणी : परभणी जिल्ह्यातील हातनूर (ता.सेलू) येथील हेमाडपंथी श्री नागनाथ मंदिरातील भगवान नागनाथ यांच्या शिवपिंडीवरील मूर्तीवर मंगळवारपासून (२५ मार्च ) सकाळी अंदाजे सहा वाजून तीस मिनिटांपासून वीस मिनिटे सूर्यकिरणोत्सवांचा अभिषेक सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे हा अद्भुत सोहळा भाविकभक्त अनुभवत आहेत.

मंदिर रचनेच्या वैशिष्ट्यांमुळे तीनही ऋतुंमध्ये श्री नागनाथ भगवान यांच्यावर सूर्यकिरणे येत असतात. हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यातील मार्च महिन्यात थेट मंदिर प्रवेशद्वारातूनच आलेल्या सूर्यकिरणांनी भगवान नागनाथांच्या शिवपिंडीवरील मूर्ती अधिक उजळून निघते, असे मंदिराचे सत्तरवर्षीय पुजारी बालासाहेब शेळके यांनी सांगितले. मंगळवारपासूनच सकाळी वीस मिनिटे श्री नागनाथ मंदिरात सूर्यकिरणोत्सव भाविकभक्तांना अनुभवता येत आहे. मंदिरासमोरील दोन उंच झाडांच्या मधून ही सूर्यकिरणे येत असून आणखी तीन-चार दिवस हा किरणोत्सव सुरू राहील, असे पोलिस पाटील रामचंद्र पारवे यांनी सांगितले. ग्रामस्थ शेख अन्सार यांनीही श्री नागनाथ मंदिरातील या सूर्यकिरणोत्सव सोहळ्याबद्दल माहिती दिली.

स्थापत्यकारांनी गवाक्षांची किंवा जालवातायनाची आणि मुख्य प्रवेशद्वाराची योजना अशी काही केली आहे, की खेळती हवा आणि प्रकाश शिवालयात सर्वत्र रहावा आणि शिवलिंग सुद्धा सकाळीच प्रकाशाने उजळून निघावे, अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या स्थापत्य कलाविष्काराचा अद्भुत नमुना परभणी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र हातनूर येथील श्री नागनाथ भगवान मंदिरात अनुभवायला येतो, असे परभणी येथील मूर्तीकला अभ्यासक प्रा.डॉ.सीमा नानवटे-डोल्हारे यांनी म्हटले आहे.


फोटो/व्हिडिओ – रामचंद्र पारवे, पोलिस पाटील, हातनूर 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!