श्रीकालिकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
हेलस येथील कालिकादेवीच्या ४२ व्या वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
मंठा/सेलू : प्राचीन हेमाडपंथी बांधकाम शैलीतील हेलस (ता.मंठा जि.जालना) येथील श्रीकालिकादेवी मंदिरात ४२ व्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त श्रीकालिकादेवीच्या दर्शन, महाप्रसाद व उत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी; तसेच विदर्भ, मराठवाड्यातील कासार समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली आहे. सोमवारी, ३१ मार्च रोजी वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पंडित महावीर आहेर, राजेश रवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कालिकामातेची पारंपरिक चढाव विधीद्वारे अभिषेक, महापूजा, महाआरती झाली. यजमान दाम्पत्य प्रमोद काटकर, सुमनबाई हेलसकर, डॉ.मंगेश महाजन, गजानन हेलसकर, प्रकाश विभुते, सुधाकर रेडगे, सुधाकर कासार, राहुल विजय हेलसकर, सतीश गोरे, वंदना गाडेकर (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते महापूजा पार पडली. भाविकांची मोठी उपस्थिती होती.
अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर यांची महापूजेला प्रमुख उपस्थिती होती. संस्थानच्या विकासामध्ये बहुमोल योगदान देणारे माजी सचिव स्व.दत्तात्रय प्रल्हादराव हेलसकर यांच्या कार्याची प्रेरणा सतत मिळत राहो, या उद्देशाने सभामंडपात स्व.दत्तात्रय हेलसकर यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण व लोकार्पण भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानच्या वतीने भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी रामेश्वर महाराज नालेगावकर यांचे कीर्तन झाले. अंकुश महाराज खराबे, अप्पा महाराज भुसारे व हर हर महादेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी साथसंगत केली. भागवताचार्य माणिक महाराज मांगुळकर यांचे कीर्तन व देविदास महाराज ढोके यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
मंदिरे ही जनसामान्यांची ऊर्जा केंद्रे : आमदार लोणीकर
प्राचीन काळापासून विविध मंदिर स्थळे ही जनसामान्यांचे ऊर्जा केंद्र ठरलेली आहेत. मंदिर हे केवळ उपासनेचे किंवा प्रार्थनेचे ठिकाण नसून वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एकत्र येण्याचे शक्ती स्थळ आहे, असे मत माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले. प्राचीन हेमाडपंथी मंदिेरे कमी होत आहे. त्यामुळे अशा मंदिरांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन प्राचीन संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुढाकाराने प्रयत्न केला जात आहे, असे आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले.
श्रीकालिकादेवीच्या मंदिर विकासासाठी कटिबध्द
माजी मंत्री तथा परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सोमवारी दुपारी महाआरती झाली. या वेळी संस्थानच्या वतीने लोणीकर यांचा श्रीकालिकादेवीची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देऊन अध्यक्ष सतीशराव तळणीकर, बालासाहेब दहिभाते, बाबासाहेब हेलसकर, सुभाषराव दहिभाते व सदस्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, हेलस गावाला खूप मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेला असून गावातील हेमाडपंथी मंदिरे एक प्राचीन अमूल्य ठेवा आहेत. श्रीकलिकादेवी मंदिराच्या सभामंडपाचे काम पुढील दोन ते तीन महिन्यात सुरू केले जाईल. अशी ग्वाही आमदार लोणीकर यांनी दिली; तसेच मंदिराला तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन स्थळ दर्जा प्राप्त झाल्यानंतर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध होईल. ग्रामस्थ व कासार समाज बांधवांच्या वतीने वर्गणीच्या माध्यमातून लोकवाटा उपलब्ध करून देत मंदिरातील परिसरात पेव्हर ब्लॉक व संरक्षण भिंत बांधल्याबद्दल आमदार लोणीकर यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. मतदार संघातील जवळपास २०० गावांमध्ये आपण सभामंडप मंजूर करून लहान व मोठ्या मंदिरांचा विकास केल्याचे लोणीकर म्हणाले.
कासार समाज बांधव, पंचक्रोशीतील नागरिक, मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, गोपाळराव काटकर, बबनराव हेलसकर, विलासराव वानरे, कैलासराव बोराडे, विलास घोडके, सरपंच नामदेव बनसोडे, गोपाळराव सासवडे, अभय महाराज कुंभकर्ण, भरत दहिभाते, कैलास खराबे, केशव खराबे, सहेजराव मोरे, कृष्णा खराबे, भगवान खराबे, कैलास चव्हाण, रमेश वाघमारे, शंकरराव हेलसकर, वर्धमान कासार, ज्ञानेश्वर हेलसकर, पंढरीनाथ हेलसकर, नारायण कुंभकर्ण यांच्यासह मान्यवर, पंचक्रोशीतील नागरिक, गावकरी माताभगिनी, कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव बाबासाहेब हेलसकर यांनी केले.