विसरू नको श्रीरामा मला…
सेलूत रंगली ‘चैत्र पालवी’ संगीत मैफल
सेलू : संस्कार भारती शाखा सेलू आणि श्रुती संगीत विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ३१ मार्च रोजी नूतन विद्यालयाच्या रा.ब. गिल्डा सभागृहात हिंदू नववर्षाच्या (गुढीपाडवा) स्वागतासाठी “चैत्र पालवी” सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवीट गोडीच्या भावगीत, भक्तीगीतांनी चैत्र पालवी मैफिल बहरली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंद जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून राम रोडगे उपस्थित होते. सुरुवातीला श्रुती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक तबला वादन व शास्त्रीय गायन सादरीकरणाने संगीतमय वातावरण निर्माण झाले. तद्नंतर माय भवानी तुझे लेकरं, ये रे घना ये रे घना, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, राम जन्मला ग सखे, वारा गाई गाणे प्रितीचे तराणे, केतकीच्या बनी तिथे नाचला, मोगरा फुलला, आकाशी झेप घे रे पाखरा, विसरू नको श्रीरामा मला, माळ्याच्या मळ्यामंदि पाटाचं पाणी, शोधीशी मानवा राउळी मंदिरी, देव देव्हाऱ्यात नाही, कुठे शोधिशी रमेश्वर, चाफा बोलेना चाफा चालेना अशा एकाच एक सरस गीतांनी मैफील आणखीन रंगतदार झाली. विविध संगीत पैलुने या चैत्र पालवीचा बहर वाढतच गेला.
यामध्ये डॉ. राजेंद्र मुळावेकर, डॉ. विलास मोरे, संजय मंडलिक, उल्हास पांडे, दिपक देवा, अनघा पांडे, मनिषा पांडे, सायली दिग्रसकर, सिमा सुक्ते, सुषमा दामा, वैष्णवी मुळे, प्रीती सराफ, ईश्वरी निर्मल, राजलक्ष्मी कुलकर्णी या कलाकारांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संयोजन रवी कुलकर्णी व रवी मुळावेकर यांनी केले. संचालन प्रीती सराफ, प्रास्ताविक गंगाधर कान्हेकर तर डॉ विलास मोरे यांनी आभार मानले. दरम्यान संगीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.