डॉ.संजय रोडगे यांचा रवळगावमध्ये नागरी सत्कार
सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांना ‘ग्लोबल एक्सलन्स इन एज्युकेशन’ पुरस्काराने हॉंगकॉंग येथे सन्मानित करण्यात आले. या बद्दल सेलू् तालुक्यातील रवळगाव येथे डॉ.रोडगे व डॉ.सविता रोडगे यांचा नागरी सत्कार नुकताच करण्यात आला.
डॉ.रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान समाजासाठी आदर्श ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शैक्षणिक संधी वाढाव्यात आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय महिला सशक्तीकरण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीनेही पाणीपुरवठा योजना, जलसंधारणामध्येही डॉ. रोडगे यांचे भरीव योगदान आहे, अशा शब्दांत या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गौरव केला.
याप्रसंगी सरपंच दीपक रोडगे, उपसरपंच गणेश रोडगे, शिवाजी रोडगे, गुलाबराव रोडगे, विनायक रोडगे, बाळासाहेब रोडगे, सुरेश रोडगे, सुंदर रोडगे, गोविंद भदरगे, राहुल सपाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.