हरित उर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घ्या
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन, परभणीत राज्य वीज तांत्रिक कामगारांच्या मेळाव्यात भव्य सत्कार
परभणी : राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी आणि वापर वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच राज्यात स्वच्छ, हरित आणि अखंड उर्जेसाठी सौर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केले आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचा शनिवारी, ५ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.राहुल पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि, महापारेषण कंपनीचे संचालक प्रकल्प अविनाश निंबाळकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन, नानासाहेब चट्टे, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, छत्रपती संभाजीनगरचे सय्यद नसीर कादरी, महानिर्मितीचे मुख्य महाव्यवस्थापक अनंत कोंत, धनंजय औंढेकर, जाफर पठाण, लातूरचे अरविंद बुलबुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्वच्छ आणि हरित उर्जा निर्मितीवर भर देत असल्यामुळे सर्वांची जबाबदारी वाढली आहे. पालकमंत्री कृती दलातून सर्वांना चांगले काम करायचे आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. तसेेच तांत्रिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असून, त्यांच्या प्रश्नावर १६ एप्रिल रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचे मंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकर्यांची स्थिती बदलणार आहे. मुख्यमंत्री त्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तांत्रिक कामगारही भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, तो उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर राज्यात गुंतवणूक वाढत असल्यामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार डॉ. राहुल पाटील, कुलगुरू डॉ. इंद्र मणि, अविनाश निंबाळकर, धनंजय औंढेकर यांच्यासह मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक हाजी सय्यद जाहीरोद्दीन यांनी केले. सूत्रसंचालन सतीश कासेवाढ यांनी केले. बाबुराव तोटेवाढ यांनी आभार मानले.