‘अमृत’च्या महाअमृत अभियानाला उत्साहात प्रारंभ
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेचे महाअमृत अभियानास 6 एप्रिलपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. श्रीरामजन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी या संस्थांतर्गत चालणारे विविध उपक्रम व प्रशिक्षण यांची माहिती व माहिती पुस्तिका देऊन अभियानाला सुरुवात करण्यात आली. 31 मे पर्यंत अभियान राबविण्यात येत आहे.
महामृत या अभियानांतर्गत जिल्हाभरातील लक्षित गट म्हणजेच ज्या जातींसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण अथवा महामंडळ काम करत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील समाजाला संपर्क करून संस्थे अंतर्गत चालणाऱ्या 42 योजनांची माहिती दिली जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल युवक युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात येऊन इतर माध्यमातूनही विद्यार्थी युवक युवती इत्यादींचा आर्थिक व सर्वांगीण विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाअमृत हे राबवीत आहे. या अभियानांतर्गत लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका समाजात बजावेल असा विश्वास अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी यावेळी दर्शवला आहे.