‘ जय श्रीराम ‘ च्या जयघोषात सेलूमध्ये मिरवणूक
बाहुबली हनुमान यांचा सजीव देखावा ठरला लक्षवेधी
सेलू जि.परभणी : प्रभु श्रीराम जन्मोत्सव आणि हिंदू एकता दिवसानिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती व तुम्ही आणि सेलूकर मंचाच्या वतीने रविवारी सकाळी श्रीरामांच्या भव्य प्रतिमेची शहरातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ढोल ताशांच्या निनादात १११ तोफांची सलामी देऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीचे हे दहावे वर्ष आहे.शहरातील प्रमुख मार्गावरून जेसीबीने श्रीराम प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मिरवणुकीत बाहुबली हनुमान यांचा सजीव देखावा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा दरबार, प्रभु महाकाल यांची भव्य मुर्ती, रणरागीनी ध्वज पथक व लेझीम पथक, बंजारा महिलांचे लोकनृत्य, महिला भजनी मंडळी, युद्धकला लाठी काठी, दानपट्टा प्रदर्शन, बॅण्ड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत महिला, तरुण, तरूणी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात महाआरतीने समारोप झाला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सार्वजनिक श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ऐतिहासिक भव्य श्रीराम नवमी मिरवणूक काढण्यात आली.