महावितरणचा आता ‘सेलू विभाग’; पाच तालुक्यांचा समावेश
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश
परभणी : महावितरणने परभणी मंडळातील विभाग क्रमांक दोनच्या कार्यालयाचे सेलू येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे नाव ‘सेलू विभाग’ असे करण्यात आले. नव्या पुर्नरचनेत सेलू विभागात पाच तालुक्यांचा समावेश केला आहे. मनुष्यबळाची संख्याही वाढविण्यात आली आहे. सेलू विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी होत आहे.
महावितरणच्या नांदेड परिमंडळात परभणी मंडळाचा समावेश आहे. या मंडळांतर्गत विभाग एक आणि विभाग दोन होते. ज्यात एकूण ९ तालुक्यांची विभागणी होती. यापैकी विभाग दोनमध्ये जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ तालुक्यांचा समावेश होता. सेलू हा विभाग पूर्वीपासून अस्तित्वात असला तरी, तो परभणी विभाग म्हणून कार्यरत होता. पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोडॉकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्या पुनर्रचनेची मागणी सरकारकडे करण्यात आली. त्यास मंजूरी मिळताच एक एप्रिलला महावितरणने हा निर्णय घेतला. नवीन पद्धतीने विभाग दोनमध्ये पाथरी उपविभागाचा समावेश देखील करण्यात आला आहे. परभणी विभाग क्रमांक एकमध्ये पूर्वीच्या उपविभागांसह, पालम आणि गंगाखेड उपविभागांचा समावेश करण्यात आला आहे.
विभाग एकचे कार्यक्षेत्र आता परभणी शहर, परभणी ग्रामीण, पूर्णा, पालम, गंगाखेड उपविभागांत विस्तारित झाले आहे. विभाग क्रमांक दोनच्या सेलूत स्थलांतरित झाल्यानंतर त्याचे नाव ‘सेलू विभाग’ असे करण्यात आले. परभणी विभाग क्रमांक एकचे नामांतर करून ‘परभणी विभाग’ असे केले आहे. यामुळे महावितरणच्या कार्यक्षेत्रात सुधारणा आणि अधिक कार्यक्षमतेची अपेक्षा आहे. महावितरणच्या नव्या निर्णयामुळे विभागांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल आणि स्थानिक नागरिकांना अधिक सेवा मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.
मनुष्यबळ व पदांची पुनर्रचना
यापुढे परभणी विभाग कार्यालयातील आस्थापनेवर ३६ खातेनिहाय पदे, दोन बाह्यस्त्रोत पदे अशी एकूण ३८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यातील १८ पदे विद्यमान खातेनिहाय पदांमधून वापरण्यात येणार आहेत, उर्वरीत खातेनिहाय पदे आणि बाह्यस्त्रोत पदे नव्याने निर्माण केली जात आहेत.