परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द
सेवा संकल्प शिबीर : विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची ग्वाही
सेलू शहराला सोलार सिटी करण्याचा निर्धार
सेलू जि.परभणी : सेवा संकल्प शिबीराच्या माध्यमातून सरकारच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या शिबीराचा लाभ जनतेने अवश्य घ्यावा, असे आवाहन करुन विकासाकडे वाटचाल करणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी, ९ एप्रिल रोजी दिली.
सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित शिबिरामध्ये मार्गदर्शन करतांना प्रा.शिंदे बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नतिशा माथुर, रवींद्रसिंह परदेशी, राहूल गुप्ता, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आदींसह सेलू जिंतूर शहरातील उद्योजक, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले. तर सरकारच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा संकल्प असून प्रत्येक योजनेसह प्रधानमंत्री सूर्यघर योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे पालकमंत्री बोर्डीकर यांनी नमूद केले. सेलू शहर सोलार सिटी केली जाणार असल्याचे श्री.गुप्ता म्हणाले.
या वेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने ऊसतोड कामगार सचिन नारायण आढे यांच्या वारस आई सिंधू नारायण आढे यांना ५ लाख रूपयाच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्व.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने १० एप्रिल रोजी आयोजित महाआरोग्य शिबीराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले. उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी आभार मानले.
याप्रसंगी उद्योजक रामेश्वर राठी, जयप्रकाश बिहाणी, अशोक काकडे, ॲड.दत्तराव कदम, दिनकर वाघ, प्रभाकर वाघीकर, अभय पुंडकीर, विजय वकाळे, गोपाळ रोकडे, गोविंद थिटे, सुनील मते, प्रमोद चव्हाण, सुनील भोंबे, बाळासाहेब आघाव, गणेश काटकर, कन्हैयालाल बालचंदानी, रवी डासाळकर, तुकाराम घनवटे, ज्योतीताई मोकल, भागवत दळवे, अशोक काकडे, किशोर कारके, सुदाम रोकडे आदींची उपस्थिती होती. शिबिराला बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांचे स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती, तर भांडी वितरणप्रसंगी कामगार व महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.