बीड, परभणीचा समतोल विकास साधणार

गंगाखेडमधील नागरी सत्कारात पालकमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

गंगाखेड : परळी आणि गंगाखेड तालुके एकमेकांना लागूनच आहे. माझ्या शेतालगत परभणी जिल्हा सुरू होतो, त्यामुळे बीड प्रमाणेच परभणी जिल्हा मला जवळचा आहे, असे समजूनच शरदचंद्र पवार यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यामुळे बीड व परभणी जिल्हा यात अंतर न पडू देता, दोन्ही जिल्ह्यांचा समतोल विकास साधणार, असा विश्वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे बोलताना व्यक्त केला.
माजी आमदार डॉ.मधुसुदन केंद्रे, मिथिलेश केंद्रे यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते. या वेळी खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, माजी महापौर प्रतापराव देशमुख, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार डॉ.मधुसुदन केंद्रे, भीमराव हत्तीआंबीरे, नंदाताई राठोड, तहसीनखान, अलीखान, लिंबाजी देवकते, माधवराव भोसले, जमीर शेख, ॲड.अकबर, गोविंद यादव, डॉ.देविदास चव्हाण, संयोजक मिथिलेश केंद्रे आदींची उपस्थिती होती.
या वेळी रमाई आवास योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या ५६२ घरकुलांच्या लाभार्थींना धनादेशाचे वाटप ; तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील दीडशे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे व खासदार डॉ.फौजियाखान यांचा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समिती, राज्य शासनाचे विविध विभाग आदी माध्यमातून विधायक विकासाची कामे मंजूर करून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे परभणी जिल्हावासियांच्या विश्वासास पात्र ठरतील व इथेही विकासकामे करून दाखवतील, याची झलक त्यांनी अवघ्या काही दिवसातच त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमधून दाखवून दिली असल्याचे खासदार फौजिया खान यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक माजी आयदार मधुसुदन केंद्रे यांनी केले.

राज्यातील वंचित उपेक्षित, सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासाशी व थेट लाभाशी संबंधित असलेल्या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी माझ्याकडे पक्ष नेतृत्वाने दिलेली आहे. या माध्यमातून खात्याच्या लाभार्थी घटकांचा विकास व आर्थिक उन्नती साधत असे काम करून दाखवू, की आगामी काळात मुख्यमंत्री हे खाते स्वतःकडे ठेवतील, असा विश्वास धनंजय मुंडेंनी पुढे बोलताना व्यक्त केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!