संस्कारांच्या रूजवणुकीसाठी कथाकथन महत्त्वाचे
प्रमोद देशमुख यांचे प्रतिपादन, सेलूतील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : कथा ही अभिव्यक्त होण्याचे साधन आहे. कथेद्वारे विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक विकास होत असतो. त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांच्या रूजवणुकीसाठी कथाकथन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन हेलस येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखेचे कार्यवाह प्रमोद देशमुख यांनी केले. सेलू येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत १७ एप्रिल रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखेची स्थापना करण्यात आली आहे.
शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्था कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तराव पावडे होते. प्रमुख अतिथी म्हणून हेलस येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस शाखेचे कार्यवाह प्रमोद देशमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे, ज्येष्ठ शिक्षक अनिल रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पार पडला. शाळेत साने गुरुजी कथामाला स्थापनेबद्दल श्री देशमुख यांनी कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात उल्हास पांडे यांनी सादर केलेल्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली. प्रांजल दरेकर हीने कथा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थी व पालकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सोनाली कुबरे यांनी केले. रमेश काळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.