शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचा गौरव

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचा गौरव

तंत्रज्ञानासोबत संस्कारांची रुजवणूक आवश्यक : अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे प्रतिपादन

सकाश न्यूज नेटवर्क, परभणी : ‘जुने ते सोने, नवे ते हवे’ या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील तालुका व जिल्हास्तरावरील विजेत्या शिक्षकांचा सन्मान १७ एप्रिल रोजी परभणीत करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले की, तंत्रज्ञानासोबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची रुजवणूक आवश्यक आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची रुजवणूक होणे तेवढेच गरजेचे असल्याचे नमूद केले. तंत्रज्ञान युजर फ्रेंडली आणि नॉलेज फ्रेंडली असल्यासच ते खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते, असेही ते म्हणाले.

ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.बाबर होते. डायटचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खुणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, ज्येष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, डॉ.अनिल मुरकुटे, शोभा मोकले, डॉ.अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. इयत्ता पहिली ते अकरावी वीपर्यंतच्या सहा गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला. प्रास्ताविक अधिव्याख्याता गणेश शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अनिल जाधव व श्रीमती दलाल यांनी केले. डॉ. अनिल मुरकुटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.चव्हाण, श्री. टेकाळे, श्री.कापसे, श्री.सुरकुटे, श्री.निकरड आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!