भगवद्गीता मूल्य शिक्षण स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
इस्कॉनच्या वतीने आयोजन
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : भगवद्गीतेवर आधारित “मूल्य शिक्षण स्पर्धा २०२५” चा बक्षीस वितरण समारंभ रविवार, २७ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे आयोजन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमास १०० पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक व मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
प्रमुख पाहुणे म्हणून माधव अण्णा लोकुलवार आणि डॉ. बाळासाहेब जाधव उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन करत इस्कॉनच्या उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “इस्कॉन ज्या पद्धतीने भगवद्गीतेसारख्या ग्रंथांद्वारे मुलांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करत आहे, ते अत्यंत स्तुत्य आहे.”
इस्कॉन जालनाचे अध्यक्ष रास गोविंद प्रभुजी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अत्यंत मौल्यवान विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली.
या स्पर्धेमध्ये सेलू तालुका पातळीवर जागृती ताठे, अनुष्का खंदारे आणि अनुष्का श्रीवास्तव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला माजी इस्रो अध्यक्ष एस.सोमनाथ आणि संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भाटकर यांच्या स्वाक्षरीचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरले. या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये पांडुरंग नखाते, देविदास पाटील, जन विद्युत आणि छाया पद्मावत यांचे विशेष योगदान राहिले.