श्रीपरशुराम जन्मोत्सव मिरवणूक जल्लोषात

श्रीपरशुराम जन्मोत्सव मिरवणूक जल्लोषात

सजीव देखाव्यांसह महिला टाळ पथकाने वेधले लक्ष

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सेलू येथील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या निनादात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली.

ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून मिरवणुकीला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. प्रारंभी पहेलगाम येथील आंतकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री रेणुका माता व श्री परशुराम मूर्ती पूजन आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत भगवान श्री परशुराम यांची आठ फुटी भव्य मूर्ती, श्री रेणुकामाता माहुरगड देवीच्या भव्य मुखवट्याने लक्ष वेधून घेतले. श्री परशुराम मूर्तीची पालखी, सजीव देखावे, ढोल ताशा पथक, महिला मंडळ, महिला टाळपथक लक्षवेधी ठरले. कलशधारी महिला, लेझीम पथक, मुलींचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आतषबाजीने ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

दरम्यान, या निमित्ताने परभणी रोडवरील श्री गायत्री माता मंदिरात सकाळी श्री भगवान परशुराम मूर्तीला महाभिषेक करण्यात आला. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती झाली. विविध कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!