सेलू बाजार समितीचे सभापती संचालकपदास अपात्र
गैरव्यवहाराचे प्रकरण : सभापती व सचिवाकडून १४ लाख २३ हजारांची रक्कम वसूल करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व निलंबीत सचिवाने नियमबहाय्य काम करीत गैरव्यवहार केल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. त्यामुळे सभापती चक्रधर पौळ व सचिव राजीव वाघ यांनी केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम एकूण १४ लाख २३ हजार १३ रूपये वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सभापती पौळ यांचे संचालकपद अपात्र ठरविण्यात आले आहे. सचिव वाघ यांच्यावर ही पुढील कारवाईचे आदेश म्हटले आहे. हा निर्णय जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी २८ एप्रिल २०२५ रोजी दिला आहे.
बाजार समितीचे उपसभापती प्रकाश मुळे व १४ संचालकांनी विद्यमान सभापती चक्रधर पौळ व सचिव राजीव वाघ यांनी नियमबाह्य काम करुन गैरव्यवहार केल्याने त्यांचे अधिकार संपुष्टात आणले व निलंबीत करण्याची तक्रार केली. तक्रारीवरुन त्रिस्तरीय समीती गठीत करण्यात आली.
समितीमध्ये एस.एस.तायडे, डी.ए.बैसठाकुर, राजेश किर्तनकार यांचा समावेश केला. यांनी चौकशी केली असता सभापती व सचिव यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता व काही खर्चाचे व्हाऊचर्स बनावट तायार केल्याची बाब समोर आली. त्यानुसार सभापती व सचिव यांच्याकडून एकूण १४ लाख २३ हजारांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सभापती पौळ यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सचिव वाघ यांच्यावरही पुढील कारवाई प्रस्तावीत केली आहे. सभापती व सचिव यांनी मिळून बाजार समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत हे आदेश दिले आहेत. यामुळे सेलू बाजार समितीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला असून सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.