गंगाखेड उपविभाग, चारठाणा ठाणे मराठवाड्यात द्वितीय
परभणी जिल्ह्याचा गौरव, पोलिसदलात उत्साहाचे वातावरण
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या मूल्यमापनात गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह चारठाणा पोलिस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत मराठवाड्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे जिल्ह्याचे नाव उजळले असून, जिल्हा पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे.
गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या कार्यतत्परतेमुळे हे यश मिळाले आहे. त्यांनी कार्यालयात उत्कृष्ट स्वच्छता राखली, दस्तऐवजांचे अचूक व वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
चारठाणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे यांनी ठाण्यातील रेकॉर्ड उत्कृष्टरीत्या व्यवस्थित ठेवले. ठाण्याची स्वच्छता, अभ्यागतांसाठी केलेली सोय, परिसरात केलेली बागेची सजावट लक्ष वेधून घेणारी आहे. या सर्व बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात आले आणि त्यामुळेच मराठवाड्यात दुसरा क्रमांक मिळविण्यात ते यशस्वी झाले. या यशाबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दोघांचे विशेष अभिनंदन करत परभणी पोलिस दलाच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.