विद्यार्थ्यांनो, यश टिकवण्यासाठी कठोर परिश्रम करा : प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या ७४ गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : संस्कार हे संपणारे नसतात तर ते चिरकाल टिकणारे असतात. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवले की, यश मिळते. मला जिंकायचे आहे आणि जिंकण्यासाठी मला लढायचे आहे. ही जिद्द विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. स्वसामर्थ्य, क्षमता वाढवून कठोर परिश्रम करायला हवेत. तरच मिळालेले यश टिकते. ” असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. नूतन विद्यालय, नूतन महाविद्यालय, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या ७४ गुणवंतांचा तसेच खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत विजेते आणि घटक संस्था यांचा विशेष सत्कार शुक्रवारी १६ मे रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, सपना पाटणी उपस्थित होते. कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, अजिज खाँ पठाण, नूतन विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष सीताराम मंत्री, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक प्रा. प्रविण सोनवणे, रोहीदास मोगल यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले की, ” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्था कटिबद्ध आहे. गुणवंत विद्यार्थी ही संस्थेची संपत्ती आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांमुळे संस्था व घटक संस्थांचा नावलौकिक वाढतो. ” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी स्वराज जाधव, वैष्णवी पिंपळगावकर, तृप्ती शहाणे, विभूती जामदार, मानसी मोरेगावकर, भक्ती शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जयप्रकाश बिहाणी यांनी केले. सत्कार समारंभाची भूमिका प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी मांडली. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. प्राचार्य एन.पी.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.