प्रशिक्षण करावे; की परीक्षा द्याव्यात ?

प्रशिक्षण करावे; की परीक्षा द्याव्यात ?

राज्यभरातील परीक्षार्थी शिक्षकांसमोर यक्षप्रश्न, प्रशिक्षण तारखेत बदल करण्याची मागणी

परभणी : अनेक शिक्षक शैक्षणिक पात्रता वाढ करण्यासाठी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून परीक्षा देत असतात. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षकांसाठी २ ते १२ जून २०२५ या कालावधीत वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण सर्व जिल्ह्यात एकाच टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे.  परंतु, नेमक्या प्रशिक्षण काळातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षाही होत असल्याने प्रशिक्षण करावे; की परीक्षा द्याव्यात ? असा यक्षप्रश्न राज्यभरातील अनेक परीक्षार्थी शिक्षकांसमोर आहे.

दरम्यान, मुक्त विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक विचारात घेता वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तानाजी कांबळे आणि सचिव संजय केवटे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या संचालक यांना १६ मेरोजी निवेदनाव्दारे केली आहे. वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी १५ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया होती. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती लांबणीवर पडली. २१ एप्रिल ते ६ मेपर्यंत ती पूर्ण झाली. ८ मेपर्यंत दुरूस्तीसाठी वेळ दिला गेला. त्यामुळे प्रशिक्षण साधारणत: २६ मेपर्यंंत पूर्ण होईल, असा कयास बांधला गेला.

मात्र, परिषदेने संकेतस्थळावर २ ते १२ जून असा प्रशिक्षणाचा कालावधी जाहीर केला आहे. मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षा २७ मे ते १२ जून, तर पदव्युत्तर परीक्षा २७ मे ते ६ जून २०२५ या कालावधीत आहेत.  दरम्यान, राज्यातील ४० हजारावर शिक्षकांनी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे. यातील अनेक शिक्षकांच्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा असणार आहेत. त्यामुळे परिषदेकडून प्रशिक्षणाच्या तारखांत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.

अनेक शिक्षक दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक अर्हतेत वाढ करीत असतात. २ ते १२ जून २०२५ या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण काळात अनेक शिक्षकांच्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा असणार आहेत. त्यामुळे नेमके प्रशिक्षण करावे, की परीक्षा द्याव्यात हा मोठा यक्षप्रश्न आमच्या शिक्षक बांधवांसमोर निर्माण झाला आहे. मुक्त विद्यापीठ परीक्षा वेळापत्रक विचारात घेता परिषदेने प्रशिक्षण तारखांत बदल करावा ही विनंती. – तानाजी कांबळे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा २७ मे २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत आहेत. परिषेदकडून वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही याच काळात आयोजित केले आहे. त्यामुळे शिक्षकांचे कोणतेही नुकसान होऊ नये. यासाठी परिषदेने प्रशिक्षण तारखांत बदल करणे आवश्यक आहे – यशवंत मकरंद, जिल्हाध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ, परभणी

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!