प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्काचा इस्रोच्या कार्यक्रमात सहभाग
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का अनंत तेलभरे हीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रतिष्ठित युविका (युवा वैज्ञानिक कार्यक्रम) वैज्ञानिक प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे १७ मे ते २ जून २०२५ या कालावधीत अंतराळ उपयोग केंद्र (SAC), अहमदाबाद येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तनिष्काला निरोप देण्यासाठी शाळेचे प्रतिनिधी सेलू रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. इस्रोचा युविका कार्यक्रम हा शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि त्याच्या उपयोगांबद्दल मूलभूत ज्ञान प्रदान करणारा असून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देतो. हा दोन आठवड्यांचा निवासी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये प्रख्यात शास्त्रज्ञांशी संवाद, प्रयोगशाळा भेटी, हाताने प्रयोग, रोबोटिक्स आणि रॉकेट मॉडेलिंग यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
डॉ.रोडगे यांनी सांगितले, “तनिष्काची या कार्यक्रमासाठी निवड ही शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. ती आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने शाळेचे नाव उज्ज्वल करेल, याची आम्हाला खात्री आहे.” तनिष्कानेही आपले विचार व्यक्त करताना म्हटले, “इस्रोच्या या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी माझे सर्वोत्तम देईन आणि शाळेचा गौरव वाढवीन.”
या यशस्वी निवडीबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, विज्ञान शिक्षक नारायण चौरे आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.