७८ वा आंतरभारती दिवस, हैद्राबाद दर्शन ठरले अविस्मरणीय
संगीता देशमुख, वसमत
10मे हा आंतरभारती दिवस महाराष्ट्राच्या बाहेर साजरा करण्यात यावा,असे पूर्वी ठरल्याप्रमाणे यंदा हा दिवस रवींद्रनाथ टागोर यांच्या कर्मभूमीत अर्थात पश्चिम बंगाल येथे साजरा करण्याचे मागील वर्षी ठरले होते. परंतु काही कारणास्तव हे ठिकाण रद्द झाले. कमी वेळात नियोजन होईल आणि तेही रिवाजाप्रमाणे महाराष्ट्राबाहेरच झाला पाहिजे, यानुसार कोणते ठिकाण निवडावे, यावर ऑनलाईन चर्चा होऊन सर्वांनुमते महाराष्ट्राच्या सीमेलगतचे राज्य म्हणून हैद्राबाद निवडण्यात आले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा लोकांचा प्रतिसाद कमी होता. हैद्राबाद अनेकांनी, अनेकदा पाहिलेले होते. तरीसुद्धा ही यात्रा फक्त यात्रा नाही तर आंतरभारती परिवाराचे एक स्नेहमीलन आहे, आपल्या लोकांना वर्षातून एकदा तरी भेटलेच पाहिजे म्हणून जमा होण्याची गर्दी कमी असली तरी भेटण्याचे दर्दी असणारे आम्ही गोवा, उदगीर, नागपूर, आंबाजोगाई, वसमत, लातूर, हैद्राबाद नांदेड येथून 35 जण आणि हैद्राबादहून कार्यक्रमासाठी आलेले 20 जण एकूण 55 जण एकत्र जमलो.
10मे ला सकाळी 9 वाजता आम्ही सर्वजण हैद्राबादला नरेंद्र भवन येथे एकत्र जमलो. मनीषा आर्य दीदी व त्यांच्या टीमने अगत्याने व सहृदय स्वागत केले. चहा व नास्ता करून कार्यक्रमाला सुरुवात केली. नोंदीसाठी मनीषा दीदींनी आकर्षक अशी डायरी- पेन भेट म्हणून प्रत्येकाला दिली.आर्य काकू, कांता कलबुर्गी व जमुना डगावकर यांनी “धर्म तो एकही सच्चा, जगत को प्यार देवे हम ” ही प्रार्थना गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पांडुरंग नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली. दुपारी जेवण झाल्यानंतर मा. पांडुरंग नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व अमर हबीब व श्रुतिकान्त भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत”आंतरभारती दिन” साजरा करण्यात आला. यात अमर हबीब , शिवाजी सूर्यवंशी,कांता कलबुर्गी यांनी आंतरभारती दिन यासंदर्भात मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात पांडुरंग नाडकर्णी यांनी, आंतरभारती दिन का साजरा करतो, सानेगुरुजींनी फक्त पंढरपूरच्या मंदिरासाठी नाही तर महाराष्ट्रालगतच्या सर्व मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा, यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत माहिती देऊन 10 मे या दिवसाचे महत्त्व सांगितले. याच कार्यक्रमात हिंदी प्रचार सभा तर्फे अमर हबीब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. श्रुतिकान्त भारती यांनी त्यांचा सत्कार केला.राजा मंगळवेढेकर लिखित “सानेगुरुजी यांची जीवनगाथा” या पुस्तकावर हा ग्रंथ वाचून सानेगुरुजी कर्मभूमी अंमळनेर तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल माझाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांचे परिचय सत्र संपन्न झाले. भेटीगाठी, सुसंवाद, चर्चा, परिचय, यात हा दिवस कसा गेला, हे देखील कळले नाही.
आंतरभारती दिवस हा दरवर्षी सोबत सदस्यांची यात्रा घेऊन येत असतो. अनेकांनी हैद्राबाद कितीही वेळा पाहिले असले तरी आंतरभारती परिवारासोबत पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक होते.
11 मे रोजी सकाळी नरेंद्रभवन येथून 35 जण यात्रेला निघालो. येथील सुप्रसिद्ध चारमिनार व मक्का मजीद पाहिली. चारमिनार हे स्मारक १५९१ मध्ये बांधले गेले आणि ते हैदराबादचे प्रतीक मानले जाते. चारमिनार हे हैदराबादचे संस्थापक, मुहम्मद कुली कुतुब शाह यांनी बांधले होते. ते त्यांच्या नवीन राजधानी हैदराबादमधील पहिली इमारत होती.आम्ही सर्वानी इथे खरेदी केली.त्यानंतर हैद्राबाद येथेच चौमहल्ला राजवाडा पाहिला.असफ जाही राजवंशाच्या पूर्वीच्या राजवाड्याच्या ठिकाणी हा राजवाडा बांधण्यात आला होता . आजच्या काळात असलेल्या या राजवाड्याचे बांधकाम निजाम अली खान असफ जाह दुसरा यांनी १७६९ मध्ये सुरू केले होते. त्यांनी चार राजवाडे बांधण्याचे आदेश दिले होते ज्यावरून, चौमहल्ला हे नाव पडले आहे.भव्य दिव्य, अत्यंत विहंगम असे दृश्य इथले आहे.भारतीय स्वातंत्र्यापूर्वी हैद्राबाद संस्थान हे निजामाच्या ताब्यात होता. आपण ज्या मराठवाड्यात राहतो, त्याच मराठवाड्यावर या निजामाने केलेले राज्य, त्याने केलेला जनतेचा अनन्वित केलेला छळ, त्यातून मुक्तता मिळावी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा, त्यातील अनेकांचे बलिदान, हे सर्व तिथे आठवले.काही राजवाड्याच्या सौंदर्याला अशी काळी किनार सुद्धा असते. कितीही काळ मागे पडला तरी अशा काही बाबी पुन्हा पुन्हा डोकावतातच. त्यानंतर येथील प्रसिद्ध असलेले सालारजंग संग्रहालय पाहिले. सालार जंग संग्रहालय हे भारताच्या हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध कलासंग्रहालय आहे. अनेक निजामकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तू येथे प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. सालारजंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय आहे. सालारजंग संग्रहालयात अंदाजे ४३,००० वस्तू व ५०,००० पुस्तके आहेत.
हैद्राबादच्या सातव्या निजामाचे पंतप्रधान नवाब मीर युसुफ अली खान सालारजंग (तिसरे) ह्यांनी ह्या दुर्मिळ वस्तू जमविण्यासाठी ३५ वर्षे मेहनत घेतली व त्यासाठी आपल्या मिळकतीतील मोठा हिस्सा खर्च केला.लेकरं व मोठ्यांना सुद्धा आकर्षित करणारी बाब म्हणजे इथे तासातासाला एक कृत्रिम माणूस घड्याळाचे टोल देतो
हे पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. हा सर्व आनंद घेऊन आम्ही याच परिसरात जेवणे केली. जेवणानंतर कडकडीत उन्हात थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी स्नो वर्ल्ड येथे गेलो. काहीजणानी याचा मनमुराद आनंद लुटला तर काहीजणानी याच वेळात मनीषा दीदी यांच्या हैद्राबाद येथील निवासस्थानी भेट दिली. मला तिथे आर्यकाका आसपास आहेत, असा भास होत होता. काकांच्या आठवणी व काकूंचा सहवास हा आंतरभारतीच्या कार्यासाठी नेहमी प्रेरणादायी असतो. त्यानंतर सर्वजण मिळून हुसेन सागरमधून बोटिंग करत जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीकडे गेलो. जेवढी भव्य दिव्य मूर्ती तेवढीच शांती प्रदान करणारे मनमोहक असे ठिकाण.तलावाच्या मध्यभागी १६ मीटर उंचीचा आणि जवळजवळ ३५० टन वजनाचा उभा असलेला भगवान बुद्धांचा एक भव्य पुतळा, पांढऱ्या ग्रॅनाइटपासून बनलेला हा पुतळा ‘जिब्राल्टरच्या खडकावर’ आहे. पुतळ्यावरील प्रकाशयोजना पाहण्यासारखी आहे.
आशियातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव, हुसेन सागर तलाव इब्राहिम कुली कुतुबशहाच्या कारकिर्दीत 1562 मध्ये खोदण्यात आला. मुसी नदीच्या उपनदीवर बांधलेल्या या तलावाला हुसेन शाह वली यांचे नाव देण्यात आले आहे. हुसेन सागर तलाव सुरुवातीला शहराच्या सिंचन आणि इतर पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधण्यात आला होता. तिथेच बाहेर येऊन संध्याकाळच्या वेळी लूंबिनी पार्कमध्ये रंगीबेरंगी कारंजे, आकर्षक विद्युत रोषणाई, लेजरमधून हैद्राबाद शहराचे नामकरण, शहराचा इतिहास, भारतीय खेळाडू, भारतीय नेते यांचे सुंदर प्रदर्शन यातून दाखवले. दिवसभराचा थकवा या सुंदर पर्यटनाने किंचितही जाणवला नाही. नरेंद्र भवन येथे येऊन रात्रीचे जेवण घेतले.
दि. 12 मे ला नरेंद्र भवन मध्ये सकाळचा नास्ता घेऊन बिर्ला मंदिरात गेलो. हे बिर्ला मंदिर हैद्राबादमधील हुसेन सागर तलावाच्या दक्षिण टोकाला स्थित आहे. ते नौबत पहाडच्या जुळ्या टेकडी असलेल्या काला पहाडच्या वर स्थित आहे. बिर्ला घराण्याने १९७६ मध्ये हैदराबाद मंदिर बांधले आणि ते राजस्थानमधून आयात केलेल्या पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधले. १३ एकर जागेवर वसलेली ही टेकडी २८० फूट उंचीवर आहे. आत श्रीकृष्णाची मूर्ती आहे. भारतात असेही मंदिरे, धार्मिक ठिकाणे हे श्रीमंत होत चालली आणि सरकारी शाळा गरीब होत चालल्या, मंदिरेही गरीब – श्रीमंत असा भेद दिसतो आहे. त्यात देवाची मंदिरे ही देवाच्या नावावरून नाही तर व्यक्तीच्या नावावरून ओळखल्या जातात, ही बाब विचारांती आहे. तिथून ऐतिहासिक अशा गोळकोंडा या किल्ल्याला भेट दिली.
11 व्या शतकात वारंगलचा राजा काकातीया प्रतापरुद्रने येथे मातीचा किल्ला बांधला. 14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला. 1518 ला पुढे बहमनी कमजोर झाल्यावर जहागीरदार “कुली कुतुब मुल्क” यांनी स्वतंत्र राज्य घोषित केले. त्यांने मातीचा किल्ला पाडून दगडी किल्ला बांधला. या कामाला 62 वर्षे लागली.1687 मध्ये बादशाह औरंगजेब यांनी हा किल्ला घेतला.निजाम लोकांची वफादारी बघून, औरंगजेबाने त्यांना किल्ला आणि हैद्राबाद भेट देऊन निघून गेला, अशी माहिती इथे मिळाली. तिथून हैद्राबादपासून काही अंतरावर असलेल्या “समतेचा पुतळा” येथे गेलो.हैदराबाद इथे श्री रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी म्हणजेच “समतेचा पुतळा’ आहे. 216 फुट उंचीचा हा भव्य पुतळा अकराव्या शतकातील भक्तिसंप्रदायाचे पुरस्कर्ते संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे, श्री रामानुजाचार्य यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात, म्हणजे श्रद्धा, जातीपाती आणि पंथ यात समानतेची शिकवण रुजवली. याआधी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आंतरभारतीच्याच यात्रेमध्ये पाहिलेला होता. त्यामुळे यावेळी मनात वेगळ्या संकल्पना होत्या. परंतु तिथे गेल्यावर किमान माझा तर भ्रमनिरास झाला. तिथले वातावरण अत्यंत भक्तिमय, कमालीचे स्वच्छ, आणि बांधकाम नितांत सुंदर आणि कोरीव, देखणे असे होते. इथेच दुपारची जेवणे आटोपली. त्यानंतर आम्ही हिंदी प्रचार सभेकडे गेलो. 1935 मध्ये स्थापन झालेल्या हिंदी प्रचार समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य अत्यंत निष्ठेने व सेवाभावीवृत्तीने हिंदीच्या प्रचारासाठी 90 वर्षापासून काम करतात. श्रुतिकान्त भारती यांच्या नेतृत्वाखाली आमचा यथोचित सन्मान करून आम्हाला समारोपीय बैठकीसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी हिंदी प्रचार सभेचे कार्य व उद्देश आणि आम्ही आंतरभारतीचे कार्य व उद्देश यावर चर्चा करून विचारांची देवाणघेवाण केली. हैद्राबादला तिथल्या लोकांशी बोलून खूप छान वाटले. तिथे समारोपीय कार्यक्रमात प्रत्येक सदस्याने आपले मनोगत व्यक्त केले. अनेकांनी कौतुक केले तर काहीनी पुढील यात्रेसाठी काही सूचनाही केल्या. नेहमीप्रमाणेच याही वर्षी या यात्रेत लहान, तरुण, वृद्ध, महिला असे सर्वच वयोगटातील व क्षेत्रातील सदस्य उपस्थित होते. आंतरभारती हा परिवार आहे, ज्यात पर्यटन आहे, संस्कृती अभ्यास आहे,वैचारिक बैठक आहे, मनमुराद आनंद आहे,प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि एकमेकांना भेटण्याची ओढ आहे.या पर्यटनातून आनंदासोबत समाजात एकता, प्रेमाची रुजवण आणि विचारांची पेरणी करतो, याचा सार्थ अभिमान आहे. हे फक्त पर्यटन नाही तर एकमेकांना देण्याचे हे प्रवचन आहे. ज्याची वैचारिक बैठक पक्की आहे,ज्याला स्वआनंदासोबत समाजाला काहीतरी दयायचं असते,ते सर्व अडथळे पार करून या यात्रेला येतातच. म्हणूनच 10मे ही तारीख आंतरभारती परिवारासाठी खूप मोठी पर्वणी आहे.
००००