जयसेन इंगोले यांची अवर सचिवपदी पदोन्नती
परभणी : मुंबई येथे मंत्रालयात गृह विभागात कार्यरत असलेले कक्ष अधिकारी जयसेन जयप्रकाश इंगोले यांना अवर सचिवपदी पदोन्नती मिळाली आहे.
श्री.इंगोले हे हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कोंढुर (ता.कळमनुरी) येथील मूळ रहिवासी आहेत. परभणीत येथील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश इंगोले यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे शालेय शिक्षण परभणीतील मराठवाडा हायस्कूल व बाल विद्या मंदिर, तर महाविद्यालयीन शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालयात घेतले.
अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी नौकरी करीत त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची प्रथम नियुक्ती २०१३ मध्ये राज्य कर निरीक्षक, मुंबई, तर २०१६ मध्ये कक्ष अधिकारी गट ब पदावर नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये नागपूर येथे प्रशिक्षण घेतले. जून २०१९ पासून ते मंत्रालयात गृह विभागात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत. २२ मेरोजी त्यांची अवर सचिव गट-अ पदावर पदोन्नती झाली आहे. झी मराठी वाहिनीचे जनसंपर्क अधिकारी तथा कलर्स मराठीचे माजी एक्झिक्युटिव प्रोड्युसर कपिल इंगोले यांचे जयसेन हे मोठे बंधू आहेत.