परभणी जिल्हावासियांचे भरभरून प्रेम

परभणी जिल्हावासियांचे भरभरून प्रेम

कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, जिल्ह्यात परिवर्तन घडवून आण्याची ग्वाही

परभणी : विधानसभा निवडणुकीत परभणी जिल्हावासीयांनी महायुतीच्या पाठीशी भक्कम असे समर्थन उभे केल्याबद्दल आभार व्यक्त करीत, जिल्हावासीयांच्या आशिर्वादाने हे सरकार आरुढ झाले आहे. आपण मुख्यमंत्री झालो आहोत. त्यामुळेच परभणी जिल्हावासीयांचे हे भरभरून प्रेम कदापिही विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वर्षानूवर्षापासून पूर्णतः दुर्लक्षित राहिलेल्या परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकरीता महायुतीचे सरकार कटिबध्द आहे. जिल्ह्यातील सामान्य माणसात हे सरकार निश्‍चितपणे परिवर्तन घडवून आणेल, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हावासियांना दिला.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडिअम मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी, २९ मेरोजी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, खासदार डॉ.अजित गोपछडे, मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, आमदार संजय केणीकर, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आदींसह पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, परभणी जिल्ह्याने दहा ते बारा वर्षे आयात केलेला पालकमंत्री अनुभवला. त्यामुळेच मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या रुपाने या जिल्ह्यास मंत्रीमंडळात स्थान देवून, त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुध्दा बहाल केले. आता पालकमंत्र्यांच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभे राहणार आहे. जिल्ह्यातील सामान्य माणसात परिवर्तन घडावे यासाठी निश्‍चित प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे रितसर भूमीपूजन झाले आहे. त्यामुळे लवकरच सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे. पालकमंत्री बोर्डीकर यांनी कॅन्सर केअर सेंटर उभारणी संदर्भात केलेल्या मागणीचाही निश्‍चितपणे विचार केला जाईल. सेलू येथील १३२ केव्ही केंद्राचे भूमीपूजनही आजच झाले आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या वीजेच्या संदर्भात समस्यांचे निराकरण होणार आहे, नानाजी देशमुख कृषी समृध्दी योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा निश्‍चितच विकास होईल. दुसर्‍या टप्प्यातून या योजनेत यंत्र आणि तंत्रज्ञाचा पुरवठा, प्रशिक्षण, ड्रीपच्या योजना तसेच वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने त्यावर अनुदानेसुध्दा उपलब्ध होणार आहेत. एकात्मिक शेतीच्या या योजनेतून या जिल्ह्यात जलसंधारणाच्या योजनाही राबविल्या जातील, अ‍ॅग्रो प्रोसेसिंगी कस्टरला सरकारद्वारे जागा उपलब्ध करुन दिली जाईल, निम्न दुधना सिंचन प्रकल्पास पुरेसा निधी दिला आहे. आता समृध्दी महामार्गाच्या माध्यमातूनही परभणी नकाशावर येईल. याप्रसंगी पालकमंत्री बोर्डीकर यांनी प्रास्ताविकातून परभणी जिल्ह्यातील सर्वांगिण विकासासंदर्भात विविध मागण्या मांडल्या. सभेला गंगाधरराव बोर्डीकर, डॉ.केदार खटींग, डॉ.विद्या चौधरी, विलास बाबर, मंगल मुदगलकर रामकिशन रौंदळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!