
सत्कारप्रसंगी माजी आमदार भांबळे यांचा शब्द
परभणी : संतश्री साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) मंदिराच्या विकासासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी दिला.
पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सोमवारी (सहा जून) दुपारी दीड वाजता भांबळे यांनी, सेलू (जि.परभणी) शहराचे ग्रामदैवत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात जाऊन, महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना भांबळे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, विनायक पावडे, सुधाकर रोकडे, नामदेव ड्ख, अशोक अंभोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लोकमान्य टिळकांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी; तसेच श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचेही भांबळे म्हणाले. यावेळी संस्थानतर्फे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना भांबळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. संतश्रेष्ठ श्री साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) समाधी मंदिरास महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त आहे. प्रतिवर्षी आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पाँडेचरी आणि दक्षिणेतील विविध राज्यातून भाविक भक्त दर्शनास येत असतात. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला श्रींच्या यात्रा महोत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख भाविक जमतात, असे निवेदनात नमूद आहे.
भक्तांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी तसेच मंदिराचे सुशोभीकरण व विविध विकास कामांसाठी दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मंदिराला पर्यटन स्थळ क्षेत्राचा दर्जा देऊन, राष्ट्रसंत श्री साईबाबांच्या पाथरी येथील जन्मभूमीच्या धर्तीवर त्यांच्या सद्गुरूंच्या समाधी मंदिराचा देखील विकास व्हावा, असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी पुजारी सुधिर मंडलिक, वामनराव मंडलिक, मोहन खापरखुंटीकर, अजित मंडलिक आदींसह भक्तगण उपस्थित होते.