वालूरमध्ये दीपोत्सव उत्साहात
परभणी : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील वालूर येथील चक्राकार बारवेचे (हेलिकल स्टेपवेल) सौंदर्य सोमवारी सायंकाळी दिपोत्सवात उजळून निघाले.जिल्ह्यात प्राचीन बारव संवर्धन मोहिमेअंतर्गत, तीन दिवसांच्या श्रमदानातून १७ मे रोजी वालूर ग्रामस्थांनी चक्राकार बारवाला पुनर्जीवित केले. ही बारव सोळाव्या शतकातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगितले जाते. मृगनक्षत्राच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (सहा जून) सायंकाळी या बारवाची ग्रामस्थांनी विधीवत पूजा केली. महाआरती करून दिपोत्सव साजरा केला. तहसीलदार दिनेश झांपले, सरपंच संजय साडेगावकर, मंडळ अधिकारी माने, तलाठी नीलेश पराचे, शैलेश तोष्णीवाल, राजेश साडेगावकर, रामराव बोडखे, गोविंद सोनी, योगेश मुंढे, गणेश खर्डे, दत्ता राख, दराडे आदींसह महिला, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.