घोडके पिंपरी येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम, शेतकऱ्यांना मिळाले महत्त्वाचे मार्गदर्शन
सेलू : सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी येथे शुक्रवारी, १३ जून रोजी बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रात्यक्षिकाला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. या वेळी शेतीत उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाच्या तंत्राविषयी सखोल माहिती देण्यात आली.
बियाणे पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाणांमार्फत पसरणारे विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाणांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी बियाणांवर वेगवेगळी जैविक आणि रासायनिक औषधांची प्रक्रिया करणे, यालाच बीज प्रक्रिया म्हणतात. यावेळी कृषीदूतांनी या प्रक्रियेचे फायदे सविस्तरपणे समजावून सांगितले.
बीज प्रक्रिया केल्याने जमिनीतून बियाणांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, बियाणांची उगवण क्षमता वाढते, रोपे सतेज आणि जोमदारपणे वाढतात आणि पिकाच्या उत्पादनात वाढ होते, असे स्पष्ट करण्यात आले. यामुळे कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करणे शक्य होते, असेही नमूद करण्यात आले.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषीदूत अभिषेक पांचाळ, सत्यम बुद्रुक, आकाश चव्हाण, गोविंद चोले, वरद डख, अक्षय डव्हळकर, नितीन ढंगळे, संदेश दौंड, स्पंदन डोंगरे आणि गोपाल दुम्हारे यांनी केले. त्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एन. चव्हाण, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. एस. चव्हाण, प्रा. एस. डी. गाडेकर आणि प्रा. एम. एन. करंजे यांचे मार्गदर्शन लाभले.