नूतन विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात
वाजतगाजत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठपुस्तके वाटप
सेलू : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सोमवारपासून (१६ जून) जिल्हाभरात उत्साहात सुरू झाल्या आहेत. ठिकठिकाणच्या शाळांमध्ये वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी शालेय शिक्षण समिती व विविध समित्यांचे पदाधिकारी सदस्य, शिक्षक उपस्थित होते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सेलू येथील नूतन विद्यालयात प्रवेशद्वारावरच बॅंड पथकाच्या तालात व लेझीम पथकाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील आदींनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शासनाच्या मोफत पाठयपुस्तक वाटप योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तकाचे वाटप करण्यात आले. पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा बरडे यांनी केले. उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी आभार मानले.