समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
परभणी, दि. १६ : समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. इतर सर्व अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेनुसार ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येत असून, संबंधित अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. काही विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी ‘रिव्हर्ट बॅक’ करण्यात आले होते, परंतु अद्याप हे अर्ज फेरसादर करण्यात आलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना अर्ज फेरसादर करण्यासाठी दिनांक १० जून २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत त्रुटींची पूर्तता न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात येतील, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर. एच. एडके यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह परभणी, मानवत, सेलू, पुर्णा व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह परभणी, सेलू, पुर्णा, मानवत, गंगाखेड येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर पात्र घटकांतील इयत्ता आठवीपासून ते कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दिनांक ११ जून २०२५ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम, तसेच इंटरनेट व वाय-फाय सुविधा मोफत पुरविल्या जातात. पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. एडके यांनी केले आहे.