प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये स्पॉट परीक्षा उत्साहात
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना संधीचे बळ देऊ, सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू – डॉ संजय रोडगे
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश CBSE स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनरोजी श्रीराम प्रतिष्ठान आउटस्टँडिंग टॅलेंट SPOT परीक्षा 2025 यशस्वीरित्या पार पडली. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना CBSE शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भरघोस शिष्यवृत्ती प्रदान करून प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये CBSE अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो, तसेच उत्कर्ष विद्यालय सेलू (सेमी इंग्रजी माध्यम), प्रॉस्परस पब्लिक स्कूल सेलू(स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम) ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय सेलू (सेमी इंग्रजी माध्यम) या शाळेतही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
यावर्षी इयत्ता 1ली ते 10वीच्या 540 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आणि उत्साहाने सहभाग घेतला. मंठा, परतूर, चारठाणा, चिकलठाणा, पाथरी, मानवत, जिंतूर, मोरेगाव, डेंगळे पिंपळगाव, पाटोदा, विडोळी, वालूर यासह परभणी जिल्ह्यातील विविध गावांमधून विद्यार्थी आपल्या पालकांसह परीक्षेला हजर झाले. 100 गुणांची ही परीक्षा विज्ञान, गणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांवर घेण्यात आली.
डॉ.संजय रोडगे यांनी परीक्षेदरम्यान उपस्थित पालकांना शाळेच्या सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. परभणी जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट CBSE निकाल, शाळेतील अत्याधुनिक VR लॅब, रोबोटिक लॅब, अटल टिंकरिंग लॅब, सर्व विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, तसेच खेळांसाठी भव्य मैदाने आणि इतर सर्व सुविधांचा त्यांनी आलेख मांडला. यामुळे पालकांमध्ये शाळेबद्दल विश्वास आणि उत्साह निर्माण झाला.
याच कार्यक्रमात शाळेतील माजी यशस्वी विद्यार्थी डॉ मयूर माणिकराव डख एम डी मेडिसिन,हेमाटोलोजी कॅन्सर इन्स्टिटयूट नवी दिल्ली यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.आणि यावर्षी जेईई मध्ये टॉपर शाहू कॉलेज लातूर या दोन्ही विद्यार्थ्यांचा डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
परीक्षेनंतर अनेक पालकांनी तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू केली आणि भरघोस शिष्यवृत्तीसह आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित केला. “तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोतम संधी” या ब्रीदवाक्याला साजेसा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचा ठरत आहे. प्रिन्स इंग्लिश CBSE स्कूल आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या या प्रयत्नांमुळे परभणी जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली होत असून, येत्या शैक्षणिक वर्षातही हा उपक्रम असाच यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या स्पॉट परीक्षेसाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित सर्व घटक संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.