पावसाची ओढ; नवांकुरे सलाईनवर
परभणीला दमदार पावसाची प्रतीक्षा
परभणी : जून महिन्यातील २० दिवसांत जिल्ह्यातील नऊपैकी पाच तालुक्यात आणि ३१ महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सिंचनाची थोडी फार व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरने पाणी देत नवांकुरांच्या वाढीसाठी धडपड सुरू केल्याचे दिसून येत आहे. मागील पाच-सहा दिवसापांसून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर झाले असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत आभाळ भरून येते. थेंबं तुटतात. अधूनमधून कुठे भुरभुर सुरू होते. कुठे एखादा शिडकावा होतो. पण काही वेळातच चक्क ऊन पडत आहे. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. बेमोसमी तसेच सुरूवातीच्या अल्प मोसमी पावसावर बहुतांश भागात पेरण्या झाल्या असून, कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. रोपांची उगवण झाली असली, तरी जमिनीतील आधीची ओल झपाट्याने कमी होत आहे. पोषक वाढीसाठी दमदार पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाऊस लवकर न झाल्यास, दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या दारात उभे ठाकल्याचे चित्र आहे.
मृग कोरडा, ३१ मंडळात अल्प पाऊस
परभणी जिल्ह्यात यंदा मे महिन्याखेर तब्बल १३१.३ मिलिमीटर पाऊस झाला. जूनच्या २० दिवसांत सरासरी सात दिवस पाऊस झाला. त्यातही ५२ पैकी ३१ मंडळात ५० टक्क्यांपेक्षाही खूपच कमी अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. मृग नक्षत्र तर कोरडेच गेले. दमदार पाऊस न झाल्यास शेतीचे गणित बिघडून दुबार पेरणीचे संकटही ओढावू शकते, असे चित्र आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४५.२ मिलिमीटर पाऊस झाला. आहे. तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) – परभणी : ५२.६, गंगाखेड ३९.१, पाथरी ६६.७, जिंतूर ३३.७, पूर्णा ६८.३, पालम ५८.९, सेलू २६.७, सोनपेठ २९.५, मानवत ३४.७
छायाचित्र सौजन्य : शिवबाबा शिंदे, लिमला