लग्नातील अवास्तव खर्च टाळा, मुलींच्या उच्च शिक्षणावर भर द्या

लग्नातील अवास्तव खर्च टाळा, मुलींच्या उच्च शिक्षणावर भर द्या

शेख सुभान अली यांचे आवाहन, सेलूतील मुस्लीम समाजातील गुणवंतांचा सत्कार

सेलू : मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी, त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च व व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी मुलींच्या लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळून तोच पैसा त्यांच्या शिक्षणावर खर्च करावा, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते तथा मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली यांनी केले आहे.

सेलू येथील अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने रविवारी आयोजित मुस्लिम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात शेख सुभान अली बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद होते. सचिव शफीक अली खान, आर्किटेक्ट शेख अरशद, ऑल इंडिया आयडल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेख अब्दुल रहिम आणि मौलाना वहाब नदवी  आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांसह दहावी, बारावी, नीट, सीईटी, शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष इंजिनिअर अनीस कुरेशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय घौरी जावेद यांनी करून दिला. सूत्रसंचालन शेख मौजम आणि बागवान हारुण यांनी केले, इंजिनिअर रशिद खान पठाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख शमशोद्दिन, शेख इमामोद्दिन निजामी, हाजी निसार पठाण , हाजी शेख रफीक, जावेद घौरी, इमरान कुरैशी, शेख असगर, जकी अहेमद सिद्दिकी आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मोठी उपस्थिती होती.

रोख पारितोषिक संस्थेला दान : अल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान व इस्लामिक क्विझ स्पर्धेत पाथरी येथील खान अब्दुल गफार खान उर्दू हायस्कूलच्या शेख लबिना शेख मजीद या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे रोख सात हजार रूपयाचे पारितोषिक मिळविले. ही रक्कम तीने गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी संस्थेकडे सुपूर्द केली. याबद्दल उपस्थितांनी शेख लबिनाचे विशेष कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!