charity.maharashtra.gov.in : सार्वजनिक उत्सवांसाठी आता ऑनलाईन परवाने
अर्ज करण्याचे धर्मादाय कार्यालयाचे आवाहन
परभणी : सार्वजनिक समारंभ तसेच उत्सवांसाठी आवश्यक असलेले परवाने मिळविण्यासाठी आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावेत, असे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने (धर्मादाय कार्यालय) केले आहे. गणेश जयंती उत्सव, दुर्गादेवी नवरात्र उत्सव, अशा सार्वजनिक उत्सवांसाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था कायदा, कलम ४१-क अन्वये लागणारे परवाने प्राप्त करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://charity.maharashtra.gov.in या ठिकाणी भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी.
नोंदणी केल्यानंतर विहीत नमुन्यात अर्ज भरून पुढील कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावीत. सभासदांचे, पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड), स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र, वीज देयक, सभेची सूचना व ठराव हे आवश्यक आहेत. उत्सवासाठी परवाने केवळ ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येणार आहेत. त्यामुळे अर्जदारांनी परवाना मिळविण्यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन अनावश्यक चौकशी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून योग्य वेळी अर्ज सादर करावा, असे आवाहन धर्मादाय सहायक आयुक्त कार्यालयाने केले आहे.