सेलू पालिका प्रशासनाचा निषेध : उपजिल्हा रुग्णालयाच्या अस्वच्छ शौचालयामुळे संताप
सेलू : येथील उपजिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय या रुग्णालयात येत असतात, परंतु शौचालयाच्या या स्थितीमुळे त्यांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे.
या गंभीर समस्येबद्दल नगरपरिषद सेलूला अनेकदा कळवूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी नगरपरिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशरमाची झाडे लावून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या प्रतिकात्मक कृतीद्वारे नगरपरिषदेला त्यांची निष्क्रियता आणि गैरजबाबदारपणाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनानंतरही जर शौचालयाची साफसफाई न झाल्यास, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाचा हार घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी जयसिंग शेळके, लालू खान, चंदू कदम, रफीक खन्ना, मोहन मोरे, मारोती ढोले, रोहित शेळके, आणि ओम खेडेकर हे उपस्थित होते.