आषाढी एकादशी : विवेकानंदच्या दिंडीत हरिनामाचा गजर !
सेलू: “राम कृष्ण हरी,” “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात आणि टाळांच्या निनादात आषाढी एकादशीनिमित्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयाची दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली.
सकाळी साडेआठ वाजता विठू नामाचा जयघोष करत दिंडीला सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी, तसेच छोट्या विठ्ठल-रुक्मिणीने अक्षरशः पंढरीची आठवण करून दिली. म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी साबुदाणा खिचडीचे वाटप केले, तर लोकमंगल नगरीतील नागरिकांनी फराळ वाटून दिंडीचे स्वागत केले.
दिंडी पुढे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली. तेथे हरिभाऊ चौधरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर आणि शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. मंदिरात गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण करण्यात आले. “माऊली माऊली” या गीतावर मुलींनी सुंदर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या दिंडी सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.