‘शाळा बंद’ आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार
विविध संघटनांचा पाठिंबा, शिक्षकांची मुंबईकडे धाव
परभणी : राज्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी टप्पावाढ मागणीसंदर्भात पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय तरतूद न झाल्याच्या निषेधार्थ आणि १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने ८ व ९ जुलै रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळासह जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला असून आंदोलन पूर्णतः यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबई येथील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह मराठवाड्यातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सोमवारी, ७ जुलै रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे यांनी शाळा बंद आंदोलनास पाठिंबा संदर्भातील पत्र ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. या आधी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने समन्वयक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेलचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, दीपक कुलकर्णी, सद्दाम बागवान, अंकुश लाडगे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदन दिले आहे.
५ जूनपासून अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. या वेळी पावसाळी अधिवेशनात निधीसाठी आर्थिक तरतूद केली जाईल, असे सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस तरतूद न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्य सरकारने वारंवार आश्वासन देऊनही अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
परभणी जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळानेही ५ जुलैरोजी आयोजित सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत परभणी शहर आणि जिल्ह्यात हे आंदोलन पूर्णतः यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मंडळाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष धारासूरकर, उदय देशमुख यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघ, शिक्षक सेना, राष्ट्रवादी शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिक्षक सेल तसेच इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, निशांत हाके आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ८ आणि ९ जुलै रोजी जिल्ह्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अशंत: अनुदानित शाळांतील कामकाज मोठ्या प्रमाणावर प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.