ज्ञानसाधनाच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘भविष्याचा वेध’

ज्ञानसाधनाच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘भविष्याचा वेध’

कवी अनंत राऊत यांचे मार्गदर्शन

परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित सर्व शाखांतील इयत्ता ११ वी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने सोमवारी, ७ जुलैरोजी ‘भविष्याचा वेध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणाचा मूलमंत्र मिळाला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, संस्था सचिव प्राचार्य शीतल सोनटक्के, प्रा.विठ्ठल कांगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात शीतल सोनटक्के यांनी संस्थेतील प्रगतीचा आलेख सांगत यावर्षीचा नीट, जेईई आणि सीईटीचा निकाल खूप चांगल्या पद्धतीने लागला असून, सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विविध विभागातील विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक वृंदांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता ११ वीतील सर्व विद्यार्थ्यांचे अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. कवी अनंत राऊत म्हणाले, “तुम्ही खूप चांगल्या संस्थेत प्रवेश घेतला आहे. भविष्याचा वेध घेत शिक्षण देणारी अशी संस्था आपण निवडलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून स्वतःचे ध्येय संपादन करावे.” यावेळी ‘दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आई-वडिलांचा मानसन्मान वाढेल असे कार्य करावे, तसेच मित्रासारखी अनमोल नाती जपावीत असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. किरण सोनटक्के यांनी, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास यश संपादन करता येते, असे सांगितले. संस्थेने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार अभ्यास केल्यास पुढील वर्षातील यशाचे भागीदार आपण असाल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वच परीक्षांचा निकाल उंचाविल्याबद्दल विषय शिक्षकांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. जेईई ॲडव्हान्स्डमधील उज्ज्वल निकाल देणारे प्रेम वानखेडे व शुभम बोराडे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याकारणाने, संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के व प्रा.शीतल सोनटक्के यांच्या वतीने आयआयटी कॉलेज प्रवेशाकरिता मदत म्हणून रोख रक्कम ७५ हजार रुपये या दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.एस.डी.धुळे यांनी केले. प्रा. के.डी.शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला इयत्ता नववी ते बारावीचे तीन हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!