रस्ता अतिक्रमणमुक्त केल्याचा शेतकऱ्यांना आनंद
वाडी दमईच्या ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाविषयी कृतज्ञता
परभणी : परभणी तालुक्यातील वाडी दमई ते मटकऱ्हाळा जिल्हा ग्रामीण (रस्ता क्रमांक २५) ७ किलोमीटरपैकी वाडी दमई येथील ३ किलोमीटर लांबीचा रस्ता काही जणांनी अनेक वर्षांपासून अतिक्रमित केला होता. हा रस्ता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सहकार्याने नुकताच अतिक्रमणमुक्त करण्यात आला. याचा आनंद वाडी दमई येथील शेतकऱ्यांनी बुधवारी, ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हा प्रशासनाचे आभार मानत जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करीत व्यक्त केला.
या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, कार्यकारी अभियंता धोंडिराम उडाणशिवे, दयानंद सोनकांबळे, अनिकेत पालेपवाड यांचा सत्कार केला. या वेळी शिवाजीराव विभुते, शिवप्रसाद बिडकर, रमेशराव तरवटे, लक्ष्मणराव बीडकर, दिलीपराव देशमुख, उद्धव गायकवाड दत्तराव मोहिते, प्रल्हाद विभुते, हरिभाऊ देवडे, प्रल्हाद देवडे, पांडुरंग साडेगावकर उपस्थित होते.
वाडी दमई ते मटकऱ्हाळा रस्ता काही शेतकऱ्यांनी पूर्णत: अतिक्रमित केला होता. त्यामुळे या भागातील शेती असणाऱ्या आणि साडेगाव, मटकऱ्हाळा, संबर, आनंदवाडी, धार, मांगणगाव येथे ये-जा करण्यासाठी तसेच गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आला होता. पावसाळ्याच्या दिवसात तर या भागातील शेतकऱ्यांना तब्बल ७ किलोमीटर अंतर पार करून जावे लागत असे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांशी सुरुवातीला सामोपचाराने, वारंवार रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही सदरील शेतकरी रस्ता अडवणूक करत होते. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्याविषयी मागणी केली होती. परभणी जिल्ह्यातील वाडी दमईचा रस्ता अतिक्रमणमुक्त केल्याचा आनंद व्यक्त करीत, शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बुधवारी सत्कार केला. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मान्यवरांची उपस्थिती होती.