Crime Diary : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Crime Diary : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सेलू : सेलू तालुक्यातील कन्हेरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शासनातर्फे दुकाने निरीक्षक श्रेणी-१ विवेक परशराम पाटील यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनवर खान दिलावर खान पठाण (रा. वालूर, ता. सेलू, जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २४ नोव्हेंबर २०२० ते ९ जुलै २०२५ या कालावधीत कन्हेरवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांमध्ये, त्याची पत्नी मरीयम खान हिने ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे नमूद केले होते. ही कागदपत्रे ग्रामसेवकांनी दिली असे भासवण्यात आले होते.
या बनावट बांधकाम कामगार प्रमाणपत्राच्या आधारे, अनवर खान याने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, परभणी यांच्याकडून शासकीय लाभ मिळवला. त्याने ८ ऑक्टोबर २०२० रोजी नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार रुपये आणि १२ ऑगस्ट २०२२ रोजी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २० हजार रुपये, असे एकूण ३५ हजार रुपये मंजूर करून घेतले. खोटे दस्तावेज सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

सेलू शहरातून २४ वर्षीय तरुणी बेपत्ता

सेलू : येथील वालूर नाका परिसरातील रहिवासी मुस्कान मोइनोद्दीन फारुखी (वय २४) ही मंगळवारी, ८ जुलै रोजी सकाळी ४.०० वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहे. तिचा भाऊ, रफीक मोइनोद्दीन फारूक यांनी सेलू पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. मुस्कान १२ वी पास असून घरकाम करते. ती दिसायला ५ फूट उंच, गोरी असून मध्यम बांध्याची आहे. चेहरा गोल, नाक सरळ आणि केस काळे आहेत. ती घरातून निघताना काळ्या रंगाचा फ्रॉक, काळ्या रंगाची पॅन्ट आणि त्यावर काळ्या-जांभळ्या रंगाचा बुरखा घातलेला होता. तिच्या पायात गुलाबी रंगाची सँडल होती. ती हिंदी आणि मराठी भाषा बोलते. नातेवाईक आणि शहरात सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख करत आहेत.

शेतजमिनीच्या वादातून मारामारी

सेलू : तालुक्यातील आहेर बोरगाव येथील आदित्य बालासाहेब लहाने (वय २३) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याच कुटुंबातील तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता आदित्य यांच्या वडिलांच्या शेतात घडली. फिर्यादी आदित्य पाईप घेऊन जात असताना आरोपी पदमाकर शेषेराव लहाने, गजेंद्र शेषेराव लहाने आणि ओमकार शेषेराव लहाने (सर्व रा. आहेर बोरगाव) यांनी त्यांना अडवून मारहाण केली. पदमाकर लहाने याने काठीने मारहाण केली, तर गजेंद्र लहाने याने पाईपने मारले. ओमकार लहाने याने हातातील दगडाने आदित्यच्या डाव्या हाताच्या कोपरावर मारहाण केली. या घटनेनंतर आदित्य लहाने यांनी ८ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

मोरेगाव येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

सेलू : सेलू पोलिसांनी मोरेगाव बसस्थानक परिसरात छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. कोंडीराम गंगाराम सोनपसारे (वय ३८, रा. मोरेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी, ८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी कोंडीराम सोनपसारे याच्या ताब्यातून रोख रक्कम मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस शिपाई नारायण वैजनाथराव आघाव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कोंडीराम सोनपसारे पोलिसांच्या ताब्यात आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!