परभणीत जबड्याच्या कॅन्सरवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
विविध उपचार सुविधेमुळे रुग्णांना मोठा दिलासा

परभणी : आधुनिक जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले असताना, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झालेली कॅन्सरवरील उपचार
एका महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ.मनोज मोरे यांच्या नेतृत्वात जबड्याच्या कॅन्सरवरील एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली. यापूर्वी पुणे, मुंबई येथे जावे लागणारे महागडे उपचार आता परभणीतच उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परभणीतील एका ६० वर्षीय तंबाखूचे व्यसन असलेल्या मजुराला जबड्याचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. डॉ.मनोज मोरे यांनी त्याची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेत रुग्णाला दुर्बिणीद्वारे भूल देऊन चेहऱ्याच्या डाव्या बाजूचा संपूर्ण जबडा आणि मानेतील गाठी काढण्यात आल्या. यानंतर, प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्याने छातीची त्वचा आणि स्नायू वापरून नवीन जबड्याची रचना करण्यात आली. ही शस्त्रक्रिया राज्याच्या जिल्हा रुग्णालयांच्या इतिहासात क्वचितच केली जाते.
याव्यतिरिक्त, रुग्णालयात गुदद्वाराच्या आणि स्तन कॅन्सरसह इतर अनेक प्रकारच्या जटिल कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. ७० वर्षीय वृद्धाला गुदद्वाराच्या कॅन्सरसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून, अत्याधुनिक ‘स्टेपरल सिस्टिम’चा वापर करत डॉ. मोरे यांनी गुदद्वाराची जागा वाचवली. अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी यासाठी आवश्यक महागडी उपकरणे तातडीने उपलब्ध करून दिली. परभणीतील या आरोग्य सेवेमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
६० वर्षीय तंबाखूचे व्यसन असलेल्या मजुराच्या जबड्याच्या कॅन्सरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मंगळवारी यशस्वीरित्या पार पडली. रूग्णाची परिस्थिती स्थिर आहे.
आता परभणीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्रिय सहभागाने आणिमार्गदर्शनाखाली कॅन्सररोगावरील महागडे उपचार आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी पुणे-मुंबई येथे होणारा खर्च आणि प्रवास टाळता येणार आहे. या उपचारसंधीचा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा.
– डॉ. सदानंद भिसे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे लवकर निदान आणि योग्य उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सरला घाबरण्याऐवजी त्याला सामोरे जायला हवे आणि योग्य उपचार घ्यावेत.
– डॉ. मनोज मोरे, कॅन्सरतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी